‘मसान’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता विकी कौशलने या कलाविश्वात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘राजी’ आणि ‘संजू’ या चित्रपटातील भूमिकांनंतर त्यांच्याकडे चित्रपटांच्या रांगा लागल्या आहेत. काही दिवसापूर्वीच त्याचा ‘उरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कलेक्शन केलं. या चित्रपटानंतर तो लवकरच एक हॉरर फिल्ममध्ये झळकणार आहे.

विकीने साईन केलेला हा आगामी चित्रपट त्याच्या करिअरमधला पहिला भयपट असणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री भूमि पेडणेकर त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे भूमि आणि विकीची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या एका जहाजावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. भानुप्रताप सिंग या चित्रपटाचं दिग्दर्शिन करत असून निर्मिती करण जोहर करणार आहे.

चित्रपटाचे शीर्षक आणि इतर माहिती गुलदस्त्यात आहे. मात्र चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर काही भाग चित्रीतही करण्यात आला आहे. दरम्यान, भूमि पेडणेकरने आतापर्यंत ‘दम लगा के हईशा’, ‘टायलेट : एक प्रेम कथा’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘शुभ मंगल सावधान’ यांसारख्या चित्रपटात झळकली आहे. त्यानंतर ‘पती पत्नी और वो’च्या रिमेकमध्येही तिची वर्णी लागली आहे. अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं असून तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.