अभिनेता विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. ‘मसान’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केल्यानंतर विकीने आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. विकी ‘संजू’, ‘बॉम्बे वेलवेट’, ‘झबान’ अशा काही सिनेमांमधून झळकला. मात्र ‘उरी- द सर्जिकल स्टाईक’ या सिनेमामुळे त्याला खरी ओळख मिळाली. त्याचसोबत ‘राझी’ सिनेमातील त्याची भूमिकादेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली. बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी विकीला चांगलीच मेहनत घ्यावी लागली आहे. आतापर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याचा हा प्रवास जाणून घेणार आहोत.

विकी हा बॉलिवूडमधील एकेकाळातील प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक श्याम कौशल यांचा मुलगा आहे. बॉलिवूडशी लहानपणापासून जवळीक असतानाही विकीला सिनेसृष्टीत येण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. विकीचे वडील श्याम कौशल यांना बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे मुलाने शिक्षण घेऊन नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती.

विकीला मात्र लहानपणापासून अभिनेता व्हायचं होतं. वडिलांच्या इच्छेनुसार त्याने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मात्र ९ ते ६ अशई नोकरी करायची त्याती इच्छा नसल्याने त्याने ‘किशोर नमित कपूर अ‍ॅक्टिंग अ‍ॅकेडमी’ मध्ये त्याने प्रवेश घेतला. ‘गँगस् ऑफ वासेपूर’ या सिनेमाच्या दोन्ही पार्टसाठी विकीने दिग्दर्शक अनुराग कश्यपला असिस्ट केलं होतं. त्यानंतर २०१५ सालात आलेल्या ‘मसान’ सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. या सिनेमात विकीच्या अभिनयाचं कौतुक झालं.

विकीने त्याच्या अभिनय कौशल्याने आजवर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. खास करून तरुणींमध्ये त्याची क्रेझ जास्त आहे. विकी लवकरच सरदार उधम सिंह यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. तसचं तो ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या सुपरहिरो सिनेमात झळकणार आहे.