बॉलिवूडमध्ये घोंघावत असलेल्या #MeToo च्या वादळामध्ये सोमवारी आणखी एक धक्कादायक नाव समोर आलं. हे नाव म्हणजे अभिनेता विकी कौशल यांचे वडील श्याम कौशल. श्याम कौशल यांच्यावर दोन महिलांनी गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी जाहीर माफी मागितली आहे.

विकी कौशलचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक असून चित्रपटाच्या सेटवर असताना त्यांनी अश्लील चित्रफीत दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दोन महिलांनी केला. नमिता प्रकाश या महिलेने ट्विटरच्या माध्यमातून या अन्यायाला वाचा फोडली आहे. नमिताने ‘मनोरमा सिक्स फीट अंडर’, ‘अब तक ५६’ आणि ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिडेट’ या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

‘२००६ साली एका चित्रीकरणासाठी आमच्या चित्रपटाची संपूर्ण टीम बाहेरगावी गेली होती. यावेळी दिग्दर्शक श्याम कौशल यांनी मला व्होडका पिण्यासाठी त्यांच्या खोलीत बोलावलं. त्यानंतर मी नकार देत असतानाही त्यांनी अनेक वेळा मला ड्रिंक्स करण्याची बळजबरी केली. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी अचानकपणे माझ्यासमोर मोबाईल फोन धरला आणि त्यात अश्लील चित्रफीत दाखविण्यास सुरुवात केली. या प्रकाराला घाबरुन मी तेथून कसाबसा पळ काढला’, असं नमिताने सांगितलं.

या आरोपांनंतर श्याम कौशल यांनी ट्विटरवर लिहिलं, ‘मी व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात कायमच चांगली व्यक्ती म्हणून वागण्याचा प्रयत्न करतो. कोणाचाही अनादर करण्याचा किंवा त्यांना दुखावण्याचा माझा उद्देश नाही. नकळत मी कोणालाही दुखावलं असेल, तर मी त्यांची विनाशर्त माफी मागतो. समस्त महिला वर्ग, प्रॉडक्शन हाऊस आणि चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाची मी माफी मागतो.’

नमितानंतर अन्य एका महिलेनेही श्याम कौशल यांच्यावर आरोप केले असून ते फोन करुन त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. ‘श्याम कौशल यांनी अनेक वेळा मला फोन करुन त्यांच्या खोलीत बोलावलं होतं. मात्र मी सतत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहिले. मी त्यांना प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात आल्यामुळे त्यांनी सेटवर माझी खिल्ली उडविण्यास सुरुवात केली’, असा आरोप या महिलेने केला आहे.