बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपट रिलीज होऊन आज २० वर्षे पूर्ण झाले आहेत. हा चित्रपट आमिर खानसाठी स्पेशल तर आहेच, पण हिंदी सिनेमासाठी देखील हा चित्रपट खूपच स्पेशल ठरला. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना क्रिकेट खेळताना पाहणं हे आजही प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारं आहे. ‘लगान’ चित्रपटाच्या शेवटी जो संदेश दिलाय तो आजच्या परिस्थितीला लागू होतोय. आजच्या घडीला जर ‘लगान’ चित्रपटाचा रिमेक करायचं ठरलं तर कोणता अभिनेता ‘भुवन’ची भूमिका साकारू शकतो ? या प्रश्नाचं उत्तर स्वतः ‘भुवन’ म्हणजेच आमिर खानने दिलंय.

‘लगान’ चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आमिर खानने एक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘लगान’ चित्रपटाच्या रिमेकसाठी कोणाची निवड होऊ शकते ?, असा सवाल केल्यानंतर आमिरने ताबडतोब उत्तर दिलंय. यावेळी तो म्हणाला, “आजच्या घडीला खूप उत्तम कलाकार आहेत…रणवीर सिंह आहे…रणबीर कपूर आहे…विक्की कौशल आहे…हे सगळे उत्तम कलाकार आहेत…कदाचित ते माझ्यापेक्षाही उत्तम पद्धतीने ‘भुवन’ची भूमिका साकारतील.”

“जर कुणाला ‘लगान’चा रिमेक करायचा असेल तर मी आणि आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे अधिकार सुद्धा देऊ…आम्ही सगळ्यांनी ‘लगान’ बनवताना जो त्रास काढलाय, तो त्रास त्यांनाही काढू द्या. बनवा ‘लगान’चा रिमेक…आम्हाला सुद्धा पहायचंय…आजच्या पिढीतील तरूण अभिनेते कसं काम करतील ?, हे पहायला मला आवडेल”, असं देखील आमिर यावेळी म्हणाला.

आणखी वाचा : 20 Years of Lagaan: चार वेळा ऐकली कहाणी, दोन वर्ष ठेवलं प्रतिक्षेत…त्यानंतर आमिर खानने ‘लगान’साठी दिला होकार

यावेळी आमिर खान म्हणाला, “लगान चित्रपट माझ्यासाठी एक यात्रेप्रमाणे होता, अशी यात्रा जी आजही सुरूच आहे. या यात्रेत काही व्यक्ती लवकर सामिल झाले…काही व्यक्ती खूप नंतर आले…आमची टीम, कास्ट क्रू हे सर्वच जण खूप लवकर सामिल झाले. तुम्ही सर्वच जण आणि प्रेक्षक माझ्या या यात्रेमधला खूप महत्त्वाचा हिस्सा बनले आहेत.”

‘लगान’ हा फिल्ममेकर आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शीत केलेला तिसरा चित्रपट आहे. त्यांनी ‘पहला नशा’ मधून डायरेक्टोरियल डेब्यू केलं होतं. त्यानंतर आमिर खान आणि ममता कुलकर्णी यांना लीड रोलमध्ये घेऊन त्यांनी ‘बाजी’ चित्रपट केला. या चित्रपटात अभिनेता आमिर खानने बरेच अ‍ॅक्शन सीन्स केले आहेत.