गलवाण खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले. भारत-चीन संघर्षात चीनच्या सैनिकांचीही मोठी हानी झाली आहे. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत ठार झाले आहेत. या घटनेवर ‘उरी’ फेम अभिनेता विकी कौशल याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भारतीय सैनिकांचे कौतुक करत शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“गलवाण खोऱ्यात जीवाची बाजी लावून लढणाऱ्या भारतीय सैनिकांना सलाम. देशाच्या सन्मानासाठी तुम्ही प्राणांचे बलिदान दिले. तुमच्या कुटुंबियांसाठी मी दु:ख व्यक्त करतो. जय हिंद.” अशा आशयाचे ट्विट करुन विकी कौशल याने भारतीय शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी भारत आणि चीनदरम्यान उसळलेल्या अभूतपूर्वी संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी संयम ठेवावा असं आवाहन गुतारेस यांनी केलं आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू आहेत. दरम्यान उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे. चीनच्या सीमेवर अशा प्रकारे भारतीय जवान शहीद होण्याची अशी घटना १९७५नंतर प्रथमच घडली आहे. भारत आणि चीन दोन्ही बाजूच्या सैन्याची जिवीतहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.