“पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे माझी वैयक्तिक हानी झाली आहे”, असं अभिनेता विकी कौशलने म्हटलं आहे. मुंबईत एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्याने भारतीय जवानांविषयीच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या. या सोहळ्यामध्ये विकीला पुरस्काराने गौरविण्यात आलं. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्याने आभार मानतांना भारतीय जवानांविषयी गौरवोद्गार काढले.

“उरी चित्रपटाच्या निमित्ताने आमच्या टीमला भारतील लष्कराला जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांची खडतर मेहनत आणि देशाप्रतीचं प्रेम पाहायला मिळालं. या भेटीनंतर आपल्या जवानांप्रतीचा माझ्या मनातील आदर द्विगुणित झाला. पुलवामा हल्ला झाल्यानंतर माझ्या जवळची व्यक्ती मला सोडून गेल्याची जाणीव झाली. हा हल्ला म्हणजे माझ्यासाठी माझी वैयक्तिक हानी होती”, असं विकीने सांगितलं.

पुढे तो असंही म्हणाला, “महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. त्यामुळे मला महाराष्ट्राचा अभिमान आहे. माझा ‘उरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला. चित्रपटाचं हे यश म्हणजे आपल्या जवानांना दिलेली मानवंदना आहे”.

दरम्यान, पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये ४० पेक्षा अधिक जवान शहीद झाले. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसादही काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये याचे पडसाद सर्वाधिक पडल्याचं पाहायला मिळत आहे.