फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बायोपिकबद्दल एक व्हिडिओ निर्मात्यांनी शेअर केला आहे. या बायोपिकमध्ये विकी कौशल प्रमुख भूमिका साकारणार आहे. विकीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
मेघना गुलजार यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटासाठीचा विकीचा पहिला लूक २०१९मध्ये समोर आला होता. आता या चित्रपटाचं नावही जाहीर करण्यात आलं आहे. विकीने हा टीझर शेअर केला आहे. ‘सॅम बहादूर’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे.


सॅम माणेकशा यांची भारतीय सेनेतली कारकीर्द चार दशकांहून मोठी आहे. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत ५ युद्धात सहभाग घेतला. फिल्ड मार्शल या पदापर्यंत पोहोचलेले ते पहिले लष्कर अधिकारी होते. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता.
एका स्टेटमेंटमध्ये या चित्रपटाच्या दिग्दर्शक मेघना म्हणतात, “आज सॅम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बायोपिकला नाव मिळालं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मला सॅम यांची गोष्ट रॉनी स्क्रुवाला आणि विकी कौशल यांच्या साथीने प्रेक्षकांसमोर मांडायची संधी मिळाली.”
तर विकी म्हणाला, “मी सॅम यांच्याबद्दल माझ्या आई वडिलांकडून लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण ज्यावेळी मी ही स्क्रिप्ट वाचली, तेव्हा मला कळलं की त्यांचं काम किती मोठं आहे आणि ते खऱ्या अर्थाने देशभक्त होते. त्यांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.”