‘मसान’, ‘संजू’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ यांसारख्या चित्रपटांमुळे अभिनेता विकी कौशल चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या अभिनय कौशल्यामुळे अनेक दिग्दर्शकांना त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याच्या चाहत्यांना सुद्धा त्याला विविध भूमिकांमध्ये बघण्याची उत्सुकता आहे. ‘हाऊसफुल ४’ चे दिग्दर्शक फरहान सामजीसोबत तो एक चित्रपट करणार असल्याच्या चर्चा सध्या सिनेसृष्टीत आहेत.

‘LOL: लँड ऑफ लुंगी’ या हिंदी चित्रपटात कदाचित विकी कौशल झळकणार आहे. हा चित्रपट ‘वीरम’ या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा रिमेक आहे. ‘पी.टी.आय’ला दिलेल्या एका मुलाखतीत फरहान सामजी म्हणाले की, “मी या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर सध्या काम करत आहे. ‘हाऊसफुल ४’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचे काम सुरू होईल. हा चित्रपट मी दिग्दर्शित करेन की नाही हे अजून नक्की नाहिये.”

विकी कौशलबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, “त्याच्यासोबत काम करायला मला नक्कीच आवडेल. तो अतिशय गोड मुलगा आहे. त्याच्यासोबत काम करायला कोणाला आवडणार नाही. त्याचे वडील श्याम कौशल यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. सगळ्या गोष्टी नीट झाल्या तर आम्ही एकत्र काम करू.”

विकी कौशलच्या ‘उरी : द सर्जिकल स्टाइक’ या चित्रपटाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवली असून विकीच्या कारकिर्दीमधील हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर विकीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. विशेष म्हणजे विकी लवकरच चित्रपट दिग्दर्शक शूजित सरकार यांच्या आगामी उधम सिंह या चित्रपटात झळकणार आहे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे.