विकी कौशलचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील ‘हाऊज द जोश’ हा संवाद संसदेपासून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला होता. अंगात नवीन जोश संचारणाऱ्या या डायलॉगचा वापर करत मुंबई पोलिसांनीही भन्नाट ट्विट केलं आहे. ‘अनलॉक १’मध्ये लोकांना बाहेर फिरण्यास जरी मुभा असली तरी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणा जाणं आवश्यक आहे. म्हणूनच ‘उरी’मधील या गाजलेल्या डायलॉगला एक नवीन ट्विस्ट देत मुंबई पोलिसांनी नागरिकांना विचारलंय की ‘हाउस द डिस्टन्स?’

‘हाउज द डिस्टन्स’ या ट्विटसोबत मुंबई पोलिसांनी विकी कौशलचा चित्रपटातील फोटो पोस्ट केला आहे. मात्र या फोटोमध्ये त्याच्या तोंडाला मास्क असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘सहा फिट सर..’ असं त्याच्या फोटोखाली लिहिण्यात आलंय. बॉलिवूडमधल्या गाजलेल्या संवादांचा उत्तमरित्या वापर करत मुंबई पोलीस जनजागृती करत आहेत.

घराबाहेर पडलात तरी सहा फूट अंतराचं नियम पाळायला विसरु नका, असा संदेश मुंबई पोलिसांनी या पोस्टद्वारे दिला आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून अशा पद्धतीचे अनेक रंजक पोस्ट करून नेटकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते. सेलिब्रिटीसुद्धा मुंबई पोलिसांच्या ट्विटचं कौतुक करतात.