काही दिवसांपूर्वी ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटातील मास्क मॅनची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती. त्यातच या चित्रपटातील आणखी एका भूमिकेवरील पडदा दूर सारण्यात आला आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी झळकली असून ती पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटामध्ये स्पृहा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचं नवीन पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटामध्ये स्पृहा गंभीर, विचारी व्यक्तीरेखा साकारणार असून विद्या असं तिच्या व्यक्तीरेखेचं नाव आहे.

“मला सौरभ वर्मा यांची कथा सांगण्याची शैली खूप आवडली. ज्या प्रकारे ते कथा सांगत होते त्यावरून या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे आणि या कथेत असं काही आहे की जे मी या आधी कधीही पाहिलेलं नाही. कथा ऐकल्यानंतर माझ्या भूमिकेची लांबी किती आहे याचा मी विचार केला नाही कारण मला माहित आहे की विक्की वेलिंगकरच्या कथेत विक्की ही विद्या शिवाय अपूर्ण आहे. मला ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली आणि मला असं वाटतंय की प्रेक्षकांनाही ही भूमिका बघताना खूप चांगला अनुभव येईल,” असं स्पृहा म्हणाली.

दरम्यान,स्पृहा जोशी यापूर्वी ‘बाबा’, ‘होम स्वीट होम’, ‘मोरया’, ‘देवा’, ‘पेइंग गेस्ट’, ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ यांसारख्या चित्रपटामध्ये झळकली होती. सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा आणि लोकीज स्टुडीओचे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.