बॉलीवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा काबिल हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची भुरळ पाडण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. निर्मात्यांनी चित्रपटातील किसी से प्यार हो जाए हे नवे गाणे प्रदर्शित केले आहे.

१९७५ साली प्रदर्शित झालेल्या मूळ जुली चित्रपटातील किसी से प्यार हो जाए या गाण्यास पुर्नचित्रित करण्यात आले असून त्यास नवा साज देण्यात आला आहे.  किसी से प्यार हो जाए.. या गाण्यास जुबिन नौतियाल याने गायले आहे. तर राकेश रोशन यांनी संगीतबद्ध केले आहे. जुन्या गाण्यात काही नवीन शब्दांचा वापर करण्यात आला आहे. हृतिक रोशन आणि यामी गौतममधील रोमान्स या गाण्यात पाहावयास मिळतो. अंधत्व काय असते याची कल्पना अनेकजण करुही शकत नाहीत. पण, अंध व्यक्तिंच्या भावनांचा विचार करता त्यांच्याबद्दल नेहमीच अनेकांना सहानुभूती असते. याच अंधत्वाचा अनुभव घेत अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या ‘काबिल’ या चित्रपटामध्ये एक अंध व्यक्तिरेखा साकारली आहे. हृतिकच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. ‘काबिल’ या चित्रपटामध्ये हृतिक आणि यामी दोघेही अंध व्यक्तिरेखा साकारत आहेत. राकेश रोशन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे.

दरम्यान, चित्रपटांमध्ये रोमॅण्टिक भूमिकाही साकारणा-या हृतिकला रोमान्स ही एक भ्रामक कल्पना वाटते. काही दिवसांपूर्वीच अभिनेता हृतिक रोशनने रोमान्सविषयीची त्याची संकल्पना स्पष्ट केली होती. आगामी ‘काबिल’ चित्रपटासाठी सज्ज झालेला हृतिक म्हणला की, ‘प्रेम नाही तर रोमान्स आंधळा असतो. रोमान्स ही सर्वात जास्त घातक गोष्ट आहे. कारण, हे सर्वकाही भ्रामक आहे’. ‘रोमान्सनंतर जर का कोणती गोष्ट अस्तित्वात राहते तर ती म्हणजे प्रेम. आणि प्रेम आंधळं नसतं’. इतर लोक आपल्याबद्दल काय बोलतात, काय विचार करतात या नकारात्मक गोष्टींवर हृतिक जास्त लक्ष देत नाही. याऊलट बोल लावणाऱ्या या अशा लोकांच्या चुका माफ करण्यातच हृतिक सकारात्मकता मानतो. यावेळी हृतिकने त्याच्या खासगी आयुष्यातील नात्यांमध्ये आलेल्या चढ-उतारांविषयीही मोकळेपणाने सांगितले. ‘तुमच्यातील चांगलेपणा अथवा तुमच्यातील वाईटपणा एक ना एक दिवस तुमच्या कामातून, वागण्या बोलण्यातून समोर येणारच’, असेही हृतिक यावेळी म्हणाला.