९ फेब्रुवारीला बी टाऊनचा हॅण्डसम हंक अभिनेता नील नितीन मुकेश विवाहबंधनात अडकला. गेल्या काही दिवसांपासून बी टाऊन आणि एकंदर कलाविश्वामध्ये लग्नाचे उत्साही वारे वाहत आहेत. २०१६ मध्येही काही सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत आयुष्याच्या एका नव्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच २०१७ च्या सुरुवातीला अभिनेता नील नितीन मुकेशच्या नावाचाही समावेश झाला. उदयपूर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये नील आणि रुक्मिणीने एकमेकांना सात जन्म साथ देण्याचे वचन देत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही नील-रुक्मिणीच्या या रॉयल वेडिंगच्याच चर्चा सुरु आहेत. ‘द वेडिंग स्टोरी’च्या युट्यूब चॅनलवर नीलच्या विवाहसोहळ्याचा एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘चाँद सी मेहबूबा हो मेरी कब…’या गाण्याच्या इन्स्ट्रुमेंटल म्युझिकच्या सुरेख साथीने या व्हिडिओला अधिकच रंजक बनविले आहे. या ग्रॅण्ड विवाह सोहळ्यात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, एका राणीप्रमाणे रुक्मिणी लग्नमंडपात पोहोचली होती. त्यावेळी व्हिडिओत तिचा चेहरा पाहण्याजोगा आहे. मेहंदी, हळद आणि संगीत समारंभाची जोड देत नील-रुक्मिणीचा हा स्वप्नवत विवाहसोहळा पार पडला. या सर्व गोतावळ्यामध्ये वऱ्हाड्यांचा थाटही पाहण्याजोगा होता.

रेडिसन ब्लू उदयपूर पॅलेस रिसॉर्ट अॅण्ड स्पा येथे पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची झलक पाहताना कोणा एका स्वप्ननगरीत फेरफटका मारुन आल्याचाच भास होतो. नील-रुक्मिणीचा विवाहसोहळा आणि त्याला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड, आणि चारही दिशांना वाहणारे प्रेमाचे वारे पाहता ‘द वेडिंग स्टोरी’ तर्फे बनविण्यात आलेला हा व्हिडिओ व्हॅलेंटाइन डे साठी एक खास ट्रीट ठरत आहे.

रुक्मिणी व्यावसायिकरित्या ‘एविएशन इंडस्ट्री’मध्ये कार्यरत असून तिचे आणि नीलचे कुटुंब एकमेकांना फार चांगले ओळखतात. ‘नील हा काहीसा जुन्या विचारांवर विश्वास ठेवणारा मुलगा आहे. त्यातही लग्नासारख्या पवित्र बंधनावर त्याचा फार विश्वास आहे. त्यामुळे आपल्या जीवनाचा साथीदार निवडण्यासाठीचा निर्णय त्याने त्याच्या कुटुंबावर सोपवला होता. त्याशिवाय रुक्मिणीच त्याच्यासाठी योग्य आहे’, असे नितिन मुकेश माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.