तेलगू चित्रपट बाहुबली हा विविध भाषांमध्ये डब करण्यात आला होता. या चित्रपटाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘बाहुबली २ द कनक्ल्यूजन’ या नावाने येणार आहे. पण, तुम्हाला माहित आहे का, ‘बाहुबली २’ चा ट्रेलरही आता प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, यात एक गोष्ट वेगळी आहे. हा ट्रेलर ‘बाहुबली २’ चित्रपटाचा नसून ‘बाहुबली २ निवडणूक संग्रामा’चा आहे. संपूर्ण देशभरात छाप पाडणा-या या चित्रपटाने राजकीय नेत्यांनाही भुरळ पाडली आहे. सध्या निवडणूकांचे वारे जोरात वाहत आहेत. त्याच्या प्रचारासाठी विविध पक्षांकडून नागरिकांना आश्वासने दिली जात आहेत. पण, त्याचबरोबर काहींनी एक वेगळे प्रचारतंत्र वापरण्याचे ठरवलेले दिसतेय.

j_020217041856

उदाहरण घ्यायचे झालेच तर तामिळनाडूत फोटोशॉपचा वापर करून प्रचारासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच निधन झालेल्या जयललिता यांना तामिळनाडूच्या अम्मा ते बाहुबली अम्मा असे दाखविण्यात आले आहे. दरम्यान, बाहुबलीच्या दुस-या चित्रपटाची लोकांमध्ये उत्सुकता असताना त्याचा फायदा घेत नेते मंडळींनी ‘बाहुबली २’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांना उत्तराखंडचे तारणहर्ता म्हणून दाखविण्यात आले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही दाखविण्यात आले आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला असून त्यास पाच हजारांपेक्षाही जास्त शेअर्स मिळाले आहेत. तसेच, जवळपास अडीच लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहला आहे.

सदर व्हिडिओत, बाहुबलीमध्ये ज्याप्रमाणे प्रभास हा आपल्या आईचा त्रास वाचविण्यासाठी शिवलिंग आपल्या खांद्यावर घेतो त्याप्रमाणे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी संपूर्ण उत्तराखंडचा भार त्यांच्या खांद्यावर घेतल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रभास शिवलिंग उचलून त्याच्या खांद्यावर घेतो या दृश्यावर हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.