अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्टार किड्सवर सोशल मीडियावर टीका होत आहे. घराणेशाहीच्या या वादात आता लेखक चेतन भगत यांनी देखील उडी घेतली आहे. निर्माता विधू विनोद चोप्रा यांनी मला धमकावलं होतं. तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं, असा धक्कादायक आरोप चेतन भगत यांनी केला आहे.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

हे प्रकरण नेमकं काय आहे?

‘दिल बेचारा’ हा सुशांत सिंह राजपुतचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटावर काही समिक्षकांनी टीका केली होती. या टीकेवर चेतन भगत यांनी ट्विट करुन आपला संताप व्यक्त केला. मात्र त्यांचे हे ट्विट विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नी, प्रसिद्ध समिक्षक अनुपमा चोप्रा यांना आवडलं नाही. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करु नका असं त्यांनी चेतन यांना बजावल. या प्रतिक्रियेवर प्रत्तुत्तर देताना त्यांनी विधू विनोद चोप्रा यांच्यावर निशाणा साधला.

अवश्य पाहा – “ही बाई आता काहीही बरळतेय”; अनुराग कश्यपने साधला कंगनावर निशाणा

“मॅडम जेव्हा तुमच्या पतीने मला जाहीरपणे धमकावलं. सर्वोत्कृष्ट कथानकाला मिळणारे सर्व पुरस्कार निर्लज्जपणे बळकावले. माझ्या कथेचं श्रेय नाकारलं. मला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं तेव्हा तुम्ही कुठे होता?” अशा आशयाचे ट्विट करुन चेतन भगत यांनी विधू विनोद चोप्रा यांच्यावर टीका केली आहे. चेतन भगत सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे ट्विट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.