लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी कलाविश्वातील काही कलाकार पैसे घेऊन प्रचार करणार असल्याचा दावा ‘कोब्रा पोस्ट’ने केला. या दाव्यानंतर बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांची नावं समोर आली. कोब्रा पोस्टने जाहीर केलेल्या यादीमध्ये ३६ कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कलाकारांव्यतिरिक्त अन्य काही कलाकारांनीही पैशांचं आमिष दाखविण्यात आलं होतं. परंतु त्यांनी असं काम करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचं समोर आलं आहे.

लोकसभेच्या निवडणुका मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. त्यामुळे या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी काही कलाकारांना विचारणा करण्यात आली. यामध्ये अनेक कलाकारांनी मोठ्या रकमेची मागणी केली.तर काही कलाकारांनी थेट नकार कळविल्याचं कोब्रा पोस्टने म्हटलं आहे. मात्र या पोस्टनंतर कलाविश्वामध्ये मोठी खळबळ माजल्याचं दिसून येत आहे.

अभिनेत्री विद्या बालन, रजा मुराद, सौम्या टंडन आणि अर्शद वारसी या कलाकारांनी पैसे घेण्यास नकार दिला आहे. आम्ही काही कलाकारांना पैशांचं आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र या कलाकारांनी आमिषाला बळी न पडता थेट त्यांचा नकार कळविल्याचं ‘कोब्रा पोस्ट’च्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

‘आम्ही विद्या बालन, सौम्या टंडन, अर्शद वारसी आणि रजा मुरादला पैशांचं आमिष दाखवलं पण त्यांनी आम्हाला नकार देत जे योग्य आणि सत्य आहे त्याच मार्गाचा अवलंब केला’, असं सादर झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ‘कोब्रा पोस्ट’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा हवाला देत जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू सुद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, पुनीत इस्सर, सुरेंद्र पाल, पंकज धीर, निकीतिन धीर, टिस्का चोप्रा, दीपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा, रोहित रॉय, राहुल भट्ट, सलीम जैदी, राखी सावंत, अमन वर्मा, हितेन तेजवानी, गौरी प्रधान, सनी लिओनी, कोयना मित्रा, इवलिन शर्मा, पूनम पांडे हे बॉलिवूड सेलिब्रिटी पैसे घेऊन पक्षाचा प्रचार करण्यास तयार झाले आहेत.