विविध भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देणारी अभिनेत्री विद्या बालनने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकीकडे झिरो साइझ, बोल्ड अंदाज, फिटनेस या सर्व गोष्टींकडे कल असणाऱ्या अभिनेत्रींची चर्चा असतानाच विद्याने मात्र ही चौकट मोडीत काढली. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. अशा या ‘आऊट ऑफ द बॉक्स’ अभिनेत्रीने सोमवारी ३९वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त तिने कुटुंबिय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी थीम पार्टीचं आयोजन केलं होतं.

विद्याच्या घरातील या पार्टीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या थीम पार्टीत विद्या थीमला साजेशा गाऊन आणि हॅटमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर यावेळी कॅज्युअल लूकमध्ये पाहायला दिसला. विद्याचे आईवडील सरस्वती बालन आणि पीआर बालनसुद्धा या पार्टीला उपस्थित होते. सिद्धार्थचा भाऊ आणि ‘आशिकी २’ फेम आदित्य रॉय कपूरसुद्धा हॅट आणि कॅज्युअल लूकमध्ये पाहायला मिळाला.

VIDEO : मित्रांना बार्बेक्यू ट्रिट देत शेफ सचिनने मारला मास्टर स्ट्रोक

खरंतर विद्यासाठी हा डबल सेलिब्रेशनचा योग होता असं म्हणावा लागेल, कारण तिचा ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला. एका सामान्य गृहिणीचा रेडिओ जॉकी होण्यापर्यंतचा प्रवास यामध्ये अधोरेखित करण्यात आला आहे. या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड’देखील मिळाला.