२०१६ हे खऱ्या अर्थाने नायिकांचे वर्ष ठरले आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा ‘कहानी’ आणि ‘द डर्टी पिक्चर’सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, तिच्या चित्रपटांनी तिकीटबारीवर पण चांगली कमाई केली आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत. मात्र याबाबतीत तिची तक्रार नाही. दरवर्षी १ जानेवारी हा तिचा वाढदिवस असल्याने चाहत्यांच्या शुभेच्छांनीच नव्या वर्षांचा श्रीगणेशा करणाऱ्या विद्याला, आमिर ‘आशयघन’ चित्रपटांचा राजा आहे; अभिनेत्री म्हणून अशाच आशयघन चित्रपटांमध्ये ठसा उमटवल्याने त्याच्या नावाने आपलं कौतुक होतं आहे, याचा अभिमान वाटतो. पण नव्या वर्षांत आमिरचे चित्रपट तिकीटबारीवरही जसं विक्रमांचं परफेक्शन दाखवतात ती जादू मलाही अनुभवायला मिळू दे, अशी प्रार्थना करणाऱ्या विद्याने यानिमित्ताने ‘रविवार वृत्तांत’शी खास संवाद साधला आहे.

सरत्या वर्षांचा निरोप घेऊन नव्याची सुरुवात करताना मला ‘कहानी २’ विषयी बोलल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ‘कहानी २’चा विषय अत्यंत धाडसी आणि आपल्या समाजात आजही बहिष्कृत असलेला विषय होता. त्यामुळे तो चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी जो प्रतिसाद दिला ते पाहून खूप आनंद होतो. घरच्यांकडूनच अगदी लहान वयात होणारं मुलींचं लैंगिक शोषण ही गोष्ट अशी आहे ज्याबद्दल लोक कधी बोलायला तयार होत नाहीत, कधी त्यावर कोणाचं ऐकूनही घ्यायची त्यांच्या मनाची तयारी नसते, समजून घ्यायची तयारी नसते. त्यामुळे चित्रपट करताना तो तितक्याच संवेदनशीलतेने मांडणंही तितकंसं सोपं नव्हतं. पण ज्यांनी ज्यांनी चित्रपट बघितला त्यांच्या तोंडून एकच उद्गार निघाले ते म्हणजे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाबरोबर हा चित्रपट पाहिला पाहिजे. इतका महत्त्वाचा असा हा संवाद आहे जो घराघरांमधून मुलांबरोबर झालाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट पाहिल्यानंतर असंही होत नाही की अरे इतकं  दु:ख आहे जगात की बस्स् संपलं इथेच.. हा विचार तुमच्या मनाला शिवतही नाही. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं स्वागत केलं मी त्या सगळ्यांची आभारी आहे. या यशाचा उल्लेख इथे करायचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. २०१६ मध्ये झालेली नायिकाप्रधान चित्रपटांची गर्दी..

ही गर्दी पाहून खरं म्हणजे कमालीचा आनंद वाटतो आहे. स्त्रीमनातील बोलणारे, तिच्या सुप्त भावनांना उघड बोलण्याची ताकद देणारे असे हे चित्रपट मनोरंजकही आहेत, व्यावसायिकही आहेत आणि तुम्हाला नवल करायला लावणारेही आहेत. या सगळ्याकडे मी ट्रेंड म्हणून पाहणार नाही. या चित्रपटांमागचं सत्य एकच आहे ते म्हणजे मुळात स्त्रियांनी आता स्वत:च्या आयुष्यात मध्यवर्ती भूमिका घेतली आहे. २ कौटुंबिक व्यवस्थापन असेल, नोकरी-व्यवसाय असेल किंवा त्यांचे छंद असतील प्रत्येक ठिकाणी त्या आघाडीवर आहेत, त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन अग्रणी यश संपादन केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या यशस्वी आयुष्याचं प्रतिबिंबच चित्रपटांमधून उमटतंय. लोक त्यांच्या आजूबाजूला ज्या कर्तृत्वान, प्रतिभाशाली स्त्रिया पाहतात त्यांना चित्रपटातही त्या तशाच दिसाव्यात असं वाटतं. त्यामुळे चित्रपटांमधून स्त्री व्यक्तिरेखांची मांडणी ही अधिक सक्षम झाली आहे. प्रेक्षकांना ती मांडणी आवडली, ते चित्रपट यशस्वी ठरले. म्हणजेच  आता नायिकांच्या पडद्यावरच्या वास्तव चित्रणाला समाजमान्यता मिळाली असल्यामुळे यापुढे दिग्दर्शकही तसेच चित्रपट करणार. वरवर पाहता हे गमतीचं वाटेल पण हे वर्तुळ आहे जे आता पूर्ण झालं आहे. मला वाटतं सक्षम स्त्री पडद्यावरून लोकांसमोर आली आता याच स्त्रीची नवी नवी रूपं, त्यांची ताकद २०१७ मध्ये सगळ्यांनाच अनुभवायला मिळेल.

स्त्रियांना समाजात त्यांचा आवाज मिळाला आहे. ते आता सिनेमाच्या भाषेत खूप चांगल्या व्यक्तिरेखा, सकस आशय, त्यांच्या दृष्टिकोनातून झालेली मांडणी असं रूपांतरित होत चाललं आहे. स्त्री व्यक्तिरेखांभोवती फिरणारे चित्रपट पाहायला मिळणे, अनेक स्त्री दिग्दर्शकांनी चांगले विषय, चांगल्या कलाकारांना घेऊन बिग बजेट चित्रपट बनवणं आणि ते व्यावसायिकरीत्या यशस्वी करून दाखवणं, सगळ्या नायिकांचं आज आघाडीच्या अभिनेत्यांच्या खांद्याला खांदा लावून एकत्र काम करणं, समान मानधनाची मागणी न करता ते आपल्या कामाने हक्काने घेणं हे जे सगळं बदललेलं चित्र आहे तो काही ट्रेंडचा भाग नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. स्वत:साठी आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं. कुठल्याही स्तरातील स्त्री असेल विविध क्षेत्रांमध्ये वावरताना स्वत:चं अस्तित्व सिद्ध करायचं हा आजच्या स्त्रीचा हट्ट आहे, त्यासाठी खूप मेहनत घेऊन त्यांनी ते साध्यही केलं आहे. आणि याच गोष्टी आता चित्रपट क्षेत्रात वेगवेगळ्या अंगाने पण अत्यंत प्रभावीपणे उमटलेल्या दिसतात. या बदलात एक अभिनेत्री म्हणून माझा सहभाग आहे हीच माझ्या दृष्टीने लाखमोलाची गोष्ट आहे.

विशेषत: २०१६ नंतर पुढच्या वर्षी जे चित्रपट, ज्या प्रकारच्या व्यक्तिरेखा माझ्याकडे आल्या आहेत त्यामुळे नव्या वर्षांसाठी मी स्वत: कमालीची उत्सुक आहे. माझा प्रत्येक वाढदिवस माझ्यासाठी खास असतो. नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशीच माझा वाढदिवस असतो. हा क्षण प्रत्येकासाठी असा असतो जेव्हा हळूहळू वर्षभरातला कडवटपणा, अपयश, चिडचिड कमी कमी होत गेलेली असते. आपल्याकडे जुन्यातून शिकून नव्या वर्षांकडे आशेने पाहण्याचा, नव्या उत्साहाने कामाला लागण्याचे असे हे क्षण असतात. त्यामुळेही असेल पण वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्यामागे कितीजणांचे आशीर्वाद आहेत, त्यांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत, याची हटकून आठवण येते. माझे आई-वडील, सिद्धार्थ आणि आमचं आताचं कुटुंब, माझी टीम जी सतत मला पुढे नेण्यासाठी, मी काहीतरी चांगलं करून दाखवावं यासाठी धडपडत असते त्यांचाही खूप मोठा आधार आहे. माझे चाहते जे माझं कौतुक करतात, माझ्या अत्यंत हळव्या क्षणांमध्ये जे मला हसवतात, माझ्यासाठी प्रार्थना करतात अशा कितीतरी लोकांची मी ऋणी आहे. याही वर्षी अशाच शुभेच्छा घेऊन पुढे निघाले आहे. ‘बेगम जान’ हा माझा चित्रपट मी पूर्ण केला आहे, त्याच्या प्रसिद्धी कार्यक्रमांना आता सुरुवात होईल. फाळणीच्या काळातला, पूर्णत: ऐतिहासिक असा हा चित्रपट आहे. त्यानंतर मी ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाला सुरुवात करेन. यात पुन्हा रात्रपाळीला असलेल्या रेडिओ जॉकीच्या भूमिकेत मी असल्याने माझ्या स्वभावातला जो खोडकरपणा आहे जो अनेकदा गंभीर आशयाच्या चित्रपटांमुळे पाहायला मिळत नाही, अशी प्रेक्षकांची तक्रार असते. तर ती खटय़ाळ विद्या यातून पाहायला मिळेल.