विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारी अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. ‘सुलू’ असो किंवा मग ‘बेगमजान’ प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी विद्या नेहमीच तिच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांनाच आश्चर्यचकित करत गेली. आता विद्या अभिनयासोबतच लघूपटाची निर्मिती करणार आहे.

चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवालासह अभिनेत्री विद्या बालन लघूपटाची निर्मिती करणार आहे. ‘नटखट’ असे या लघूपटाचे नाव आहे. हा सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा सिनेमा आहे. समाजात असलेली पितृसत्ताक पद्धती, लिंगभेद, बलात्कार, घरगुती हिंसा आणि महिलांसोबत असलेल्या नात्यांचे पुरुषांकडून करण्यात येणारे वर्गीकरण यासारख्या मुद्द्यांवर हा सिनेमा प्रकाश टाकण्याचे काम करतो. लघूपट करण्याची विद्याची ही पहिली वेळ आहे.

‘ही एक अत्यंत सुंदर कथा आहे. मी या चित्रपटात भूमिका साकरण्यासोबतच निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन तुम्ही हा चित्रपट किती सुंदर आहे याची कल्पना करु शकता’ असे विद्याने चित्रपटाबाबत सांगितले आहे.

सध्या विद्या ‘मिशन मंगल’ या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नी, सोनाक्षी,शर्मन जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (कृति कुल्हारी) नजर हे कलाकार झळकणार आहेत.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म मिळून करणार आहेत. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.