सुपरस्टार एन.टी.रामाराव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाविषयी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. या चित्रपटामध्ये एनटीआर यांच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन झळकणार आहे. नुकताच तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात ‘बाहुबली’ फेम राणा डग्गुबत्ती आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर मराठी अभिनेता सचिन खेडेकर राजकीय नेते भास्करराव ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. विशेष म्हणजे विद्या बालन या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

विद्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला असून ती अत्यंत साध्या वेशात दिसत आहे. या फोटोत तिने लाल रंगाची किनार असलेली पांढरी साडी नेसली आहे. तसंच दाक्षिणात्य पद्धतीनुसार तिने केसामध्ये मोगऱ्याचा गजराही माळला आहे.

दरम्यान, अभिनेत्री रकुल प्रीत या बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या भूमिकेमध्ये झळकणार असून काही दिवसापूर्वी तिचाही लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचबरोबर बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता जिसू दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या एल.व्ही. प्रसाद यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. क्रिश जे. दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती एन. बाळकृष्ण, विष्णू इंदुरी आणि साई कोरापती करणार आहेत.