News Flash

विद्या बालन नव्या अवतारात..

बॉलीवूडची ‘हिरो’ अशी ओळख मिरवणारी एकच अभिनेत्री आहे ती म्हणजे विद्या बालन.

बॉलीवूडची ‘हिरो’ अशी ओळख मिरवणारी एकच अभिनेत्री आहे ती म्हणजे विद्या बालन. चित्रपट कुठलाही असो, विद्या बालन त्यात मुख्य भूमिकेत असली तरी आणि नसली तरीही चर्चा असते ती तिच्याच भूमिकेची.. याची झलक नुकतीच प्रेक्षकांनी ‘मिशन मंगल’च्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवली. इतकी मोठी कलाकारांची फौज आणि मुख्य भूमिकेत स्वत: अक्षय कुमार असतानाही लोकांना जिंकलं आणि त्यांच्या लक्षात राहिली ती विद्याच. विद्या आता पुन्हा एकदा फक्त तिच्याच भोवती केंद्रित असलेल्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ‘ह्य़ुमन कॉम्प्युटर’ असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांच्यावरील चरित्रपटात विद्या बालन काम करते आहे, या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. विद्याचा या चित्रपटातील नवा अवतार लोकांच्या भलताच पसंतीस उतरला आहे.

‘मिशन मंगल’ चित्रपटात शास्त्रज्ञाच्या भूमिकेत समोर आलेली विद्या आता गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. खूप दिवसांनी विद्याची मुख्य भूमिका असलेला चित्रपट तिच्या चाहत्यांना पहायला मिळणार असल्याने साहजिकच चाहते सुखावले आहेत. मात्र या चित्रपटासाठी विद्या वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर आली आहे. शकुंतला देवी या गणितज्ञ होत्या, त्यामुळे त्यांच्यावर आधारित चित्रपट करायचा तर त्यांचे हे गणित कौशल्य नेमके काय आहे हे समजून घेऊन ती भूमिका करणे गरजेचे होते. अनू मेनन दिग्दर्शित ‘शकुंतला देवी – ह्य़ुमन कॉम्प्युटर’ हा चित्रपट स्वीकारल्यानंतर जवळपास चार महिने विद्याने शकुंतला देवी कोण होत्या, त्यांचा अभ्यास, त्यांचे कौशल्य, त्यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व समजून घेऊन भूमिकेची तयारी करण्यासाठी घेतले. त्यानंतर चरित्रपटासाठी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ज्या व्यक्तीवर आधारित चित्रपट आहे, त्या व्यक्तीशी साधम्र्य साधणारा लूक.. इथेही विद्याने बाजी मारली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून यातून विद्या पहिल्यांदाच शकुंतला देवींच्या रूपात प्रेक्षकांसमोर आली आहे. याआधीही विद्याने भूमिकेनुरूप आपला लूक, देहबोली बदलण्यावर प्रचंड मेहनत घेतली आहे.  त्यामुळे दर चित्रपटागणिक बदलत गेलेले तिचे रूप प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरू आहे. यानिमित्ताने, खुद्द शकुंतला देवी यांची कन्या अनुपमा बॅनर्जी लंडनमध्ये चित्रपटाच्या सेटवर हजर झाल्या होत्या. विद्याला आईच्या भूमिकेत पाहून हळव्या झालेल्या अनुपमा यांनी विद्या हुबेहूब आईसारखी दिसत असल्याबद्दल तिचे कौतुकही केले. एकूणच या चित्रपटाच्या कथेबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता होतीच, मात्र आता विद्या यात असल्याने चित्रपटाला चार चाँद लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 2:00 am

Web Title: vidya balan shakuntala devi biopic abn 97
Next Stories
1 वेदनेचा विनोद साकारणारा दिग्दर्शक
2 ‘डॉ. आनंदीबाई ’: सेल्फीमग्न पिढीची चिकित्सा
3 अघोरी अमेरिका..
Just Now!
X