सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा अभिनेत्री विद्या बालनच्या ‘नटखट’ या लघुपटाची वर्णी लागली आहे. २०२१ च्या ऑस्करमध्ये ‘नटखट’ची निवड करण्यात आली आहे. RSVP ने त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली. विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला ‘नटखट’ या लघुपटाला ऑस्कर २०२१ मध्ये शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे, अशी पोस्ट RSVP च्या ट्विटर हॅण्डलवर करण्यात आली आहे.

“मागील एका वर्षामध्ये अनेक घडामोडी घडल्या. मात्र, या काळात आमच्या शॉर्ट फिल्मची ऑस्करसाठी निवड करण्यात आली ही खरंच फार छान गोष्ट घडली. ही लघुकथा मला अत्यंत जवळची आहे. लघुपटामुळे मला कलाकार आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळाली”, असं विद्या म्हणाली.

काय आहे नटखटची कथा

हा सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा लघुपट आहे. समाजात असलेली पितृसत्ताक पद्धती, लिंगभेद, बलात्कार, घरगुती हिंसा आणि महिलांसोबत असलेल्या नात्यांचे पुरुषांकडून करण्यात येणारे वर्गीकरण यासारख्या मुद्द्यांवर हा लघुपट प्रकाश टाकतो. ३३ मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये विद्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये नटखटची वर्णी

२०२० या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. मात्र नटखटची घोडदौड सुरुच होती. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नटखटचं स्क्रिनिंग करण्यात आलं. तसंच वी आर वन: अ ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल (२ जून २०२०) मध्ये या लघुपटाचं वर्ल्ड प्रिमिअर करण्यात आलं. तसंच इंडियन फिल्म फेस्टिव्हल स्टटगार्ट ( १५ ते २० जुलै) या काळात स्क्रीनिंग करण्यात आलं. याप्रमाणेच जर्मन स्टार ऑफ इंडिया अॅवॉर्डदेखील मिळला. इतकंच नाही तर लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल, साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल ऑरलॅडो/ फ्लोरिडा फिल्म फेस्टिव्हलसाठी देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यासोबतच मेलबर्नमध्ये इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा लघुपट दाखवण्यात आला. विशेष म्हणजे फिल्म बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचं विजेतेपददेखील नटखटने पटकावलं.