अपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड अभिनयसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारी विद्या बालन एक नामांकीत अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचे व्यक्तिमत्व समकालीन इतर अभिनेत्रींच्या तुलनेने बरेच वेगळे आहे. ती सोशल मीडीयावरील अवास्तव बडबड व फॅशन ट्रेंडच्या मदतीने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत नाही. उलट ती अभिनयावरच जास्त भर देणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

विद्याचे पती सिद्धार्थ रॉय कपूर हे देखील बॉलिवूडमधील नावाजलेले निर्माते आहेत. त्यांनी आजवर फितूर, दंगल, बरफी, हैदर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी अनेक अभिनेत्रींना सुपरस्टार पदापर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे. परंतु तरी देखील विद्या सिद्धार्थ रॉय कपूर सोबत काम करणे टाळते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या पतीने निर्मिती केलेल्या चित्रपटांमध्ये काम न करण्याचे कारण सांगितले.

मी बॉलिवूड सिनेसृष्टीतील एका मोठ्या चित्रपट निर्मात्याची पत्नी आहे. त्याने अनेकदा मला चित्रपटांसाठी विचारणा केली, परंतु प्रत्येक मी त्याला नकार दिला. कारण आमच्या नात्यात मला कोणत्याही प्रकारचा व्यवहार आणायचा नाही. मी एक व्यवसायीक कलाकार आहे. अभिनय करण्याआधी मी चित्रपटाची पटकथा, व्यक्तिरेखा, दिग्दर्शक व चित्रपटाचा आवाका यांचा योग्य विचार करुनच अभिनय करण्याची तयारी दर्शवते. तसेच त्यासाठी मी पुरेसे मानधन देखील घेते. परंतु मानधनाच्या रकमेवरुन अनेकदा निर्माता व माझ्यात काही मतभेद देखील होतात. मात्र अशा प्रकारच्या व्यावसायिक क्षेत्रांतील मतभेदांचा परिणाम मला माझ्या नात्यावर होऊ द्यायचा नाही आहे. तसेच कोणत्याही नात्यासाठी माझी मोफत काम करण्याची तयारी देखील नाही त्यामुळेच मी माझ्या पती बरोबर काम करण्यास नकार देते असे विद्या बालन मुलाखतीत म्हणाली.