‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटामध्ये एका आर.जेच्या भूमिकेत दिसलेल्या विद्या बालनने अनेकांचीच मने जिंकली होती. ‘गुड मॉर्निंग मुंबई’ असे म्हणत माईकसमोरुन आपल्या सुमधूर आवाजाने मुंबईकरांना जाग आणणाऱ्या विद्याने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला होता. विविध धाटणीच्या भूमिका निभावणाऱ्या विद्याचे हे आर.जे. चे रुप जरा हटके होते. विद्या पुन्हा एकदा तिच्या आगामी चित्रपटाद्वारे एका आर.जेच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या ‘कहानी २’ या चित्रपटामुळे चर्चेत असणाऱ्या विद्या बालनने पुढच्या चित्रपटासाठीच्याही तारखा दिल्या आहेत.

वाचा: ..म्हणून पतीच्या चित्रपटांमध्ये काम करत नाही विद्या

‘तुम्हारी सुलू’ या कॉमेडी ड्रामा प्रकारातील चित्रपटासाठी विद्या बालन काही दिवसांनी व्यग्र होणार आहे. सुरेश त्रिवेणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. भारत-पाक क्रिकेट सामन्यांदरम्यान ‘मौका-मौका’ या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या जाहिरातींमध्ये सुरेश त्रिवेणी यांचे महत्त्वाचे योगदान आहे. ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटामध्ये विद्या एका ‘लेट नाईट शो’ चे सूत्रसंचालन करणाऱ्या आर. जेच्या भूमिकेत झळकणार आहे. तिचा हा शो ‘सेमी अडल्ट’ प्रकारचा रेडिओ शो असेल. त्यामुळे एका वेगळ्याच पद्धतीने आणि नव्या कथानकासह विद्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे नक्कीच. आपल्या या भूमिकेविषयी बोलताना विद्याने एका लिंबाशी या भूमिकेची तुलना केली आहे. ‘ज्या प्रकारे कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याकरता आणि पदार्थांच्या चवीचा समतोल राखण्याकरता लिंबाचा वापर केला जातो; अगदी त्याचप्रकारची माझी भूमिका आहे. या भूमिकेद्वारे प्रेक्षकांना माझ्यातील थोडीशी खोडकर बाजूही पाहता येईल’, असे विद्या म्हणाली.

एप्रिल महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्याला पुन्हा एकदा आर.जेच्या रुपात पाहणअयासाठी प्रेक्षकांमध्येही कुतुहल पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान सध्या अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. ‘कहानी’ या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. त्यामुळे विद्या बालनचा हा आगामी रहस्य आणि थरारपट प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एका आईचा आपल्या मुलीला शोधण्यासाठी, तिला वाचवण्यासाठी केलेला संघर्ष हा ‘कहानी २’चा कथाभाग आहे. अर्थात, पहिल्या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा, विद्या बागचीचे हावभाव, तिचे संवाद अशा गोष्टी लोकांना तोंडपाठ आहेत. त्यामुळे पुन्हा कोलकात्यातच ‘दुर्गा रानी सिंग’ची कथा रंगवताना विद्या बागचीचं दडपण जास्त होतं, हेही विद्याने कबूल केलं. यात विद्याने पहिल्यांदाच अर्जुन रामपालबरोबर काम केलं आहे. २ डिसेंबरला विद्या बालनचा आगामी ‘कहानी २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.