अभिनेत्री विद्या बालनचा ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा त्याला भरभरून प्रतिसादही मिळाला. पण एका कारणामुळे हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यामध्ये एका कफ सिरपची जाहिरात केल्याने फूड अँड ड्रग्ज असोसिएशनकडून (एफडीए) नोटीस पाठवण्यात आली आहे.

चित्रपटात कफ सिरपचे प्रमोशन केल्याने एफडीएने म्हणजेच टी-सीरिजला नोटीस बजावली आहे. टी- सीरिजने विद्याच्या या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ज्या कफ सिरपची जाहिरात चित्रपटात करण्यात आली, त्यामध्ये काही आरोग्यास अपायकारक असे तत्त्व आहेत. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे एफडीएने नोटीशीत नमूद केले.

वाचा : …म्हणून दीपिकाला साथ देण्यास कंगनाचा नकार

चित्रपटात एका सामान्य गृहिणीचा आरजे होईपर्यंतचा प्रवास अधोरेखित करण्यात आला आहे. विद्या रेडिओ स्टेशनवर एक शो होस्ट करत असताना तिला खोकला येतो. तेव्हा ती कफ सिरप घेते. अशा पद्धतीने त्या कप सिरपची चित्रपटातून जाहिरात करण्यात आली. हे पाहून डॉ. तुषार जगताप यांनी एफडीएकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत एफडीएने सिरपची तपासणी केली. तपासणीनंतर त्यांनी टी- सीरिजला नोटीस पाठवली.

वाचा : बॉलिवूडमध्ये अंगप्रदर्शनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल करणने मागितली माफी 

टी- सीरिजनेही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. त्या प्रॉडक्टशी आमचा काही संबंध नसून त्याच्या दर्जासाठी ब्रँड जबाबदार आहे, असे टी- सीरिजचे अध्यक्ष विनोद भानुशाली यांनी स्पष्ट केले.