विद्या बालनच्या अभिनयावर प्रेम करणारे इंडस्ट्रीत आणि बाहेरही अनेक चाहते आहेत. सध्या हिंदी चित्रपटांमधून विद्या अपयशी ठरत असली, तरीही जेव्हा जेव्हा तिचा चित्रपट येतो तेव्हा त्या त्या भूमिकेसाठी तिची मेहनत हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. के वळ अभिनयच नाही, तर सदर व्यक्तिरेखेसाठीचा आपला लूकही तितकाच योग्य असावा, याकडेही ती काटेकोर लक्ष देते. भगवानदादांवर आधारित ‘एक अलबेला’ या चित्रपटात अभिनेत्री गीता बालीची भूमिका विद्या साकारते आहे. या चित्रपटासाठी गीता बालींच्या रूपातील विद्याचा लूक हाही असाच चर्चेचा विषय ठरला आहे.
विद्याच्या चेहऱ्यात निखळ गोडवा, निरागसपणा आणि सुंदरतेचे एक अजब मिश्रण आहे. योगायोगाने अभिनेत्री गीता बाली यांचाही चेहरा तसाच होता. तरीही लुक टेस्टमध्ये विद्या आणि गीता दत्त यांचे चेहरे इतके एकसारखे दिसू शकतील, अशी कल्पनाही आम्ही केली नव्हती, असे चित्रपटाचे निर्माते डॉ. मोहनीश बाबरे यांनी सांगितले.
विद्याच्या या लुकसाठी मेकअपमन विद्याधर भट्टे यांनी कमालीची मेहनत घेतली, तर विद्याचे कपडे हे त्या काळातील कपडय़ांप्रमाणे अनुरूप असावेत, यासाठी रंग-कपडय़ाचा पोत या सगळ्याचा बारकाईने विचार करून तिचे कपडे डिझाइन करण्यासाठी स्टायलिस्ट सुबर्णा राय चौधरी यांनी तितकाच वेळ देऊन काम केले.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे खुद्द विद्याने जेव्हा स्वत:ला गीता बाली यांच्या या रूपात आरशात पाहिले, तेव्हा ती थक्क झाली होती, असे चित्रपटाच्या सूत्रांनी सांगितले.
‘एक अलबेला’ या शेखर सरतांडेल दिग्दर्शित चित्रपटात अभिनेता मंगेश देसाई याने भगवानदादांची भूमिका केली आहे. मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, जुन्या हिंदी चित्रपटांवरचे प्रेम, गीता बाली एक अभिनेत्री म्हणून विद्याची आवडती असल्याने या चित्रपटात काम करण्यासाठी विद्याने होकार दिला.
गीता बालीच्या रूपातील विद्याचा हा फोटा आता समाजमाध्यमांमध्येही कौतुकाचा विषय ठरला आहे. विद्याच्या या मराठी चित्रपटाने यश मिळवले तर न जाणो आणखी एका चांगल्या मराठी चित्रपटात तिचा अभिनय पाहण्याची संधी रसिकांना मिळेल.