विद्या सिन्हा या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री होत्या. ‘छोटी सी बात’, ‘इन्कार’, ‘मुक्ती’, ‘पती पत्नी और वो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या विद्या सिन्हा यांचा आज ७२ वा स्मृतीदिन आहे. जबरदस्त महत्वाकांक्षा असलेल्या विद्या या एक अष्टपैलू अभिनेत्री होत्या. जवळपास एक दशक त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. दुदैवाची बाब म्हणजे तरी देखील बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्रींमध्ये त्यांचं नाव घेतलं जात नाही.

अवश्य पाहा – ‘रेप सीन पाहून आईनं घरातून बाहेर काढलं होतं’; रंजीत यांनी सांगितला थक्क करणारा अनुभव

विद्या सिन्हा यांनी २००९ साली दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, या फिल्मी जगाची स्मृती खूप कमी असते. इथे दर शुक्रवारी एक नवा सुपरस्टार जन्मला येतो अन् जुन्या सुपरस्टारला प्रेक्षक विसरतात. विशेषत: अभिनेत्रींचं करिअर खूप लहान असतं. मला वाटतं माझ्या बाबतीतही असंच घडलं असावं. करिअरच्या सुरुवातीस मी अनेक नामांकित कलाकारांसोबत काम केलं. तेव्हा माझ्याकडे खूप काम होतं. पण काही वैयक्तिक कारणांमुळे मी ब्रेक घेतला. अन् त्या ब्रेकमधून मी कधीही बाहेर पडले नाही. मी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. काही ऑडिशन्स दिले. पण माझा चेहरा प्रेक्षक विसरले आहेत असं दिग्दर्शक म्हणायचे. त्यामुळे सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करुनही कदाचित मला सुपरस्टार अभिनेत्री म्हणत नसावे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीने पाळल्या ८० हजार मधमाशा; कारण वाचून व्हाल थक्क

विद्या सिन्हा यांनी वयाच्या १८व्या वर्षी मिस बॉम्बे ही सौंदर्य स्पर्धा जिंकून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली होती. १९७४ साली ‘राजा काका’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘हवस’, ‘मेरा जीवन’, ‘जीवन मुक्ती’, ‘किताब’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ‘छोटीसी बात’ या सुपरहिट चित्रपटामुळे त्या खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यांनी आपल्या करिअरमध्ये विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, अमोल पालेकर, संजीव कुमार यांसारख्या सुपरस्टार कलाकारांसोबत काम केलं. सलमान खानच्या बॉडिगार्ड या चित्रपटात त्यांनी शेवटचं काम केलं होतं.