नाटककार विद्याधर गोखले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोखले परिवारातर्फे संगीत-नाटय़ क्षेत्रातील महनीय व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार सुप्रसिद्ध गान अभिनेत्री व नाटय़ संमेलनाध्यक्ष फैय्याज यांना प्रदान करण्यात येणार असून पुरस्कार सोहळा विद्याधर गोखले यांच्या १९ व्या स्मृतिदिनी म्हणजेच सोमवार, २८  सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दादर, माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होणार आहे.
अभिनेता प्रशांत दामले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, रोख अशा स्वरूपाचा पुरस्कार देऊन फैय्याज यांचा सन्मान केला जाणार असून फैय्याज यांची प्रकट मुलाखतही घेतली जाणार आहे.
रंगशारदा प्रतिष्ठान आणि विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठान यांच्या वतीने पुरस्कार सोहळा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नटवर्य भालचंद्र पेंढारकर आणि विद्याधर गोखले यांना अण्णा असे संबोधत. म्हणून या दोन अण्णांच्या नाटय़कृर्तृत्वाची महती सांगणारा ‘रमारमण श्रीरंग जय जय’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. वसंत वलय निर्मित या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे बालकलाकार तसेच विजय गोखले, नीलाक्षी पेंढारकर, ज्ञानेश पेंढारकर, मुकुंद मराठे, कल्याणी जोशी, मयुर सुकाळे सहभागी होतील. कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी करणार आहेत. मकरंद कुंडले व धनंजय पुराणिक साथसंगत करणार आहेत. सर्व रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.