दीडशे जाहिराती, अभिनयाचं वेड म्हणून चित्रपटांमधून छोटय़ा-मोठय़ा भूमिका आणि ‘चिल्लर पार्टी’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा लेखक अशी कलागुणांची मोठी यादी असणारे विजय मौर्य पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहेत. मराठीत ‘फोटोकॉपी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकणाऱ्या विजय मौर्य यांनी इरफान, के. के. मेननसारख्या मोठय़ा कलाकारांना जाहिरातींसाठी दिग्दर्शन केले आहे. पण जाहिरातींची गोष्ट वेगळी असते. काही सेंकदात मोठी गोष्ट सांगण्याचा तो सर्जनशील प्रयत्न असतो. चित्रपटाचं तसं नसतं. तीन तासांच्या चित्रपटासाठी कथेपासून अभिनयापर्यंत अनेक गोष्टी खुबीने विणायच्या असतात. त्यामुळे कितीही काम केलं असलं तरी चित्रपटाचं दिग्दर्शन करताना थोडासा ताण येतोच, असे विजय मौर्य सांगतात.
‘फोटोकॉपी’ ही गायिका नेहा राजपाल हिची पहिली निर्मिती. नेहाकडून या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी विचारणा झाली आणि मी ते आव्हान स्वीकारलं, असे मौर्य सांगतात. या चित्रपटाची कथाकल्पना नेहाकडे तयार होती. ती पुढे विकसित करणं आणि त्याला चांगला क्लायमॅक्स देणं त्यांच्यासाठी अवघड होऊन बसलं होतं. मग मी पूर्ण कथाकल्पनेवर काम करून नव्याने संपूर्ण कथा लिहिली. या चित्रपटाची कल्पना ही अर्थातच याआधी ‘सीता और गीता’, ‘चालबाझ’सारख्या चित्रपटांतून आपण पाहिलेली आहे. डबल रोल ही नवीन गोष्ट नाही, पण ‘फोटोकॉपी’च्या कथेत याच गोष्टीचा वेगळ्या तऱ्हेने वापर करून घेण्यात आला आहे, असे ते म्हणतात. दोन जुळ्या बहिणी जेव्हा एकाच मुलाच्या प्रेमात पडतात तेव्हा काय गोंधळ उडू शकतो, अशा गमतीशीर कल्पनेभोवती ही त्रिकोणी प्रेमकथा रचण्यात आली आहे. यात कलाकारांची निवड हा महत्त्वाचा भाग होता आणि त्यासाठी नवीन कलाकार घेण्याचं स्वातंत्र्य निर्मात्यांनी दिलं होतं, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त के लं. ‘फोटोकॉपी’मध्ये अभिनेत्री पर्ण पेठे ही दुहेरी भूमिकेत आहे. पर्णचा चेहरा लोकांना परिचयाचा झाला असला तरी तिने अजून जास्त काम केलेले नाही त्यामुळे तिचे अभिनयगुण पाहण्याची संधी प्रेक्षकांना आहे. तिच्याबरोबर नायकाच्या भूमिकेत चेतन चिटणीस या अगदी नवख्या तरुण कलाकाराची निवड करण्यात आली आहे. हिरोसाठी आम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ऑडिशन्स घेतल्या होत्या आणि तब्बल बारा हजार सर्चनंतर आम्हाला चेतनचा शोध लागला. त्याची मोबाइलवरूनच ऑडिशन झाली आणि आम्हाला पर्ण-चेतनच्या रूपात एक वेगळी फ्रेश जोडी मिळाली, असे सांगत ऑडिशनचा हा नवा फंडा यासाठी आपल्याला कसा उपयोगी पडला हेही मौर्य यांनी सहजपणे सांगून टाकले. अर्थात, पटकथेपासून ते कलाकार निवडीपर्यंतच्या त्यांच्या कामात आलेली सहजता ही त्यांच्या जाहिरातविश्वात के लेल्या कोमाच्या अनुभवातून आलेली आहे.
विजय मौर्य यांनी आजवर दीडशे जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे. जाहिरातीतून मोठमोठय़ा कलाकारांसाठी त्यांनी दिग्दर्शन केले असले तरी जाहिरात आणि चित्रपट या दोन माध्यमांमध्ये जी तफावत आहे ती नाकारता येत नाही, असं ते म्हणतात. काही सेकंदाच्या जाहिरातीतही एक फॉरमॅट ठरलेला असतो. म्हणजे मिनिटभराच्या जाहिरातीत ३० सेकंद ही त्या कंपनीची माहिती असते, २३ सेकंदांमध्ये तुम्हाला तुमचं उत्पादन एका गोष्टीत थोडीशी भावनिकता, मजा-मस्ती वाढवून लोकांसमोर मांडायचं असतं. हा भागच मोठा आव्हानात्मक असला तरी सततच्या कामाने त्यात एक सहजता येते. चित्रपटाचं मात्र तसं होत नाही त्याचं कारण दिग्दर्शकाला सगळेच निर्णय घ्यायचे असतात. तिथे कथाही त्यालाच निवडायची असते, कलाकार, तुमच्या सिनेमाची प्रकाशयोजना कशी असेल, कलाकार कपडे काय घालणार अशा सगळ्याच गोष्टी दिग्दर्शक ठरवतो. बरं एकीकडे त्याला स्वातंत्र्य असतं आणि दुसरीकडे सतत आपले कलाकार, तंत्रज्ञ यांच्याबरोबर चर्चा करत, बदल करत चित्रपट घडवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. तुमच्या चित्रपटाचा एक आत्मा असतो तो जर तुम्हाला गवसला तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात. त्यामुळे जाहिरातींपेक्षा चित्रपट दिग्दर्शन अवघडच असे ते ठामपणे सांगतात. इरफान खान, के. के. मेनन, अनुष्का शर्मा अशा मोठय़ा कलाकारांबरोबर काम केलं असलं तरी जाहिरातींमध्ये काम करताना त्यांच्या स्टारडमनुसार अनेक गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. इरफान आणि केके तर माझे मित्र आहेत, कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आम्ही एकत्र असल्याने त्यांच्याबरोबर काम करताना अडचण कुठलीच नसते. पण त्यांच्या स्टारडमनुसार एका ठरावीक चौकटीतच तुम्हाला काम करावं लागतं. इथेही पटकथा महत्त्वाची असल्याने कलाकार पहिल्यांदा त्याच्यावर चर्चा करतात आणि मग त्यांच्या शैलीनुसार, क्षमतेनुसार ती जाहिरात आकार घेते. चित्रपटात तर पटकथेची भूमिका जास्त महत्त्वाची ठरते, असं ते सांगतात.
पटकथा लेखकाला बॉलीवूडमध्ये महत्त्व दिलं जात नाही, पण खरं तो या चित्रपट निर्मितीचा कणा असतो, असं विजय मौर्य मानतात. एकूणच चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत शिरणारा लेखक हा पहिला माणूस असतो. तो कथा लिहितो, पडद्यावर ती कशी आकाराला येईल याचं कल्पनाचित्र नजरेसमोर ठेवून तो लिहितो आणि मग त्याने कागदावर उतरवलेली गोष्ट त्याच ताकीदने प्रत्यक्षात पडद्यावर आणण्याचं काम दिग्दर्शकाचं असतं. पटकथा जमली नाही तर अख्खा चित्रपट फसतो, असं ते सांगतात. त्यामुळे लेखकाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी घेतली. ‘फोटोकॉपी’ पूर्ण होऊन प्रदर्शनाच्या तयारीत आहे तोवर अन्य पटकथांवरही त्यांचं काम सुरू झालं आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्हीकडून संधी आलेली आहे, त्या दृष्टीने कामही सुरू आहे, पण पटकथा लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे विजय मौर्य सध्या तरी लेखनापेक्षा दिग्दर्शनाच्या प्रक्रियेतच जास्त रमले असल्याने लवकरच त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाविषयीही आपल्याला ऐकायला मिळण्याची शक्यता जास्त आहे.

Juna Furniture trailer
Video: स्वतःच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या बाबाची गोष्ट, ‘जुनं फर्निचर’चा विचार करायला भाग पाडणारा ट्रेलर प्रदर्शित
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
ankush chaudhari says he never used bad words
“त्या दिवसापासून पुन्हा शिवी दिली नाही”, ‘लालबाग परळ’, ‘दुनियादारी’ चित्रपटांबद्दल अंकुश चौधरी म्हणाला, “माझ्या आईने…”
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या