चित्रपटाच्या सेटवर क्रू मेंबरची छेड काढल्याप्रकरणी अभिनेता विजय राजवर निर्मात्यांकडून कारवाई करण्यात आली. ‘शेरनी’ या चित्रपटातून त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. छेडछाड प्रकरणी विजयला गोंदिया येथून अटक करण्यात आली होती. अटकेच्या काही वेळानंतर त्याची जामिनावर सुटकादेखील झाली होती.

विजयच्या छेडछाड प्रकरणामुळे चित्रपटाची बदनामी नको व्हायला म्हणून त्याला काढून टाकल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं. आता विजयच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याचा शोध निर्मात्यांकडून सुरू आहे. मात्र यासाठी निर्मात्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. कारण चित्रपटाच्या पहिल्याच शेड्युलमध्ये विजय राजचं बरंचसं शूटिंग होतं. शिवाय त्याच्यासोबत चित्रीत केलेली दृश्ये टीमला पुन्हा एकदा नव्या कलाकारासह शूट करावं लागणार आहे. विजय राजसोबत तब्बल २२ दिवसांचं शूटिंगचं शेड्युल होतं. दर दिवसाला शूटिंगचा २० लाख रुपये खर्च, याप्रमाणे जवळपास दोन कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड चित्रपटाच्या निर्मात्यांना बसणार आहे.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री विद्या बालनची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सुरू आहे. या चित्रपटात विजय राजदेखील महत्त्वाची भूमिका साकारत होता. मात्र, या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान त्याच्यावर छेडछाडीचा आरोप लावण्यात आला होता. क्रू मेंबरमधल्या युवतीची छेड काढल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून विजय राजला अटक करण्यात आली होती.