दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतिचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मास्टर’ हा करोना काळात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्य ऑफिसवर जणू काही जादूच केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये चित्रपटाने जवळपास १८० कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे.
आंध्र बॉक्स ऑफिस डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार मास्टर या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जगभरातून जवळपास १८८.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात चित्रपटाने ११४ कोटी रुपयांची कमाई केल्याचे म्हटले जात आहे. ‘मास्टर’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास ३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. करोना काळात इतकी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
View this post on Instagram
‘मास्टर’ हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, यूएई आणि इतर काही देशांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्य ऑफिसवर धूमाकुळ घातला आहे. मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचे समोर आले. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, मुराद खेतानी दोन आठवड्यांपूर्वी मास्टर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हैदराबदला गेले होते. त्यांना चित्रपट प्रचंड आवडला आणि त्यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केले आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी रक्कमही दिली असल्याचे म्हटले जाते.
‘मास्टर’ या चित्रपटात अॅक्शनचा भरणा आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. या चित्रपटात विजय सेतुपतिसोबतच मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 12:23 pm