18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

Vijayadashami 2017 : डायमंडची अंगठी प्रिय – जुई गडकरी

'दागिन्यांची मला प्रचंड आवड असल्यामुळे त्यांचा संग्रह करते.'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 30, 2017 10:13 AM

जुई गडकरी

मला दागिन्यांची प्रचंड आवड आहे. माझ्याकडे सगळे पारंपरिक दागिने आहेत. अगदी ठुशी, वजट्रिका, बाजूबंद, चिंचपेटी असं सगळं आहे. मी जिथे कुठे फिरायला जाते तिथली दागिन्यांची परंपरा मी हमखास जाणून घेते. ठाण्यात मी एक दुकान शोधून काढलं आहे, तिथे मला हवं तसं दागिन्यांचं डिझाइन करून मिळतं. मला सोन्यापेक्षा डायमंड खूप आवडतं. त्यातही डायमंड्सच्या अंगठय़ा जास्त प्रिय. माझ्याकडे आता सहा-सात डायमंड्सच्या अंगठय़ा आहेत. माझ्याकडे असलेले दागिने मी रोज घालत नाही पण मला प्रचंड आवड असल्यामुळे त्यांचा संग्रह करते.

पारंपरिक दागिन्यांचा संग्रह प्रत्येकाकडे असावा असं मला वाटतं. माझ्या नशिबाने मी आजवर केलेल्या भूमिकांचा लुक पारंपरिक होता. त्यातही अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगांसाठी मला दागिने घालावे लागायचे. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ या तिन्ही मालिकांमध्ये काम करताना दागिने घालण्याचा आनंद मी घेतला आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी ठरवलं होतं की, मला मिळालेल्या पैशांतून थोडं-थोडं सोनं घ्यायचं. असं थोडं-थोडं सोनं जमवून मी स्वकमाईतून केलेला पहिला दागिना म्हणजे पाटल्या. त्या केल्या तेव्हा कळलं नव्हतं की ती एक आयुष्यभराची गुंतवणूक आहे. पण नंतर हळूहळू त्याचं महत्त्व समजलं. एकदा सोन्याची वस्तू केली तर ती कायमस्वरूपी तुमच्या उपयोगी पडते. कठीण प्रसंगात ते विकून त्यातून मिळणारा पैसा फायदेशीरच ठरतो.

मी ठाण्यात घर घेतलं तेव्हा त्याच्या डाऊन पेमेंटसाठी माझ्या आईने तिचे सगळे दागिने विकले होते. तेव्हाच मी ठरवलं होतं की, माझ्या कमाईतूनच मी तिला तिचे विकलेले दागिने पुन्हा करून देईन आणि तसंच झालं. तिच्याकडे जे जे दागिने होते ते सगळे पुन्हा करून दिले. आपल्या जवळच्या व्यक्तीला अशी भेट देणं हे खूप समाधानकारक असतं. मी जसं माझ्यासाठी किंवा आईसाठी दागिने करते तसंच मी गणपती बाप्पासाठीसुद्धा करते. दरवर्षी एखादी वस्तू किंवा दागिना करते. यावर्षी मी बाप्पासाठी चांदीचा पाट घेतला आहे.

response.lokprabha@expressindia.com, @chaijoshi11

संकलन : चैताली जोशी

First Published on September 30, 2017 10:13 am

Web Title: vijayadashami 2017 celebrity article jui gadkari lokprabha