देशात करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. करोनाबाधितांची आणि मृतांची समोर येणारी आकडेवारी ध़डकी भरवणारी आहे. यामुळेच देशातलं शैक्षणिक वेळापत्रक अक्षरशः कोलमडून गेलं आहे. अनेक परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येत आहे. याच विषयावर आता एक नवा मराठी चित्रपट येत आहे.

दिग्दर्शक विजू माने यांनी ही घोषणा केली आहे. ते लवकरच ‘शंकर पाटील ऑन मॅट्रिक’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या नावासोबत एक वाक्यही दिसत आहे. होय मी करोना लाभार्थी असं हे वाक्य आहे. तसंच या पोस्टरमध्ये एका व्यक्तीच्या हातात बोर्डाच्या परिक्षेचं मार्कशीट दिसत आहे.

असं शिकून कसं काय भरणार पोट?
तर म्हणे हाताची घडी नि तोंडावर बोट.
लवकरच थिएटरात निकाल लागणार……

#मराठी #सिनेमा #आगामी #घोषणा
#New #Marathi #film #Announcement

Posted by Viju Mane on Wednesday, April 21, 2021

विजू यांनी हे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. त्यांनी यासोबत एक कॅप्शनही दिलं आहे. ते म्हणतात, “असं शिकून काय भरणार पोट? तर म्हणे हाताची घडी नि तोंडावर बोट..लवकरच थिएटरात निकाल लागणार..”

या सिनेमात कोणते कलाकार असतील, कोणती गाणी असतील याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अनेक मराठी कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन हे पोस्टर शेअर करत विजू यांना आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

देशातली करोनाची परिस्थिती लक्षात घेता १०वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएसई, आयसीएसई सोबत आता महाराष्ट्र बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे,जेईई मेन्स, नेट या परीक्षाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.