थरारपट आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट हे बॉलीवूडमधील यशस्वी समीकरण आहे. आजपर्यंत विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केलेले वेगवेगळ्या प्रकारचे थरारपट आणि भूतपट हे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे दैवी शक्ती आणि भूतपटांवर भट्ट कॅ म्पची एक प्रकारची मक्तेदारी आहे, ती विक्रम भट्ट यांच्या चित्रपटांमुळेच. हिंदीतला पहिला थ्रीडी भूतपट बनवण्याचा ‘विक्रम’ही याच भट्टांच्या नावावर आहे. आणखी एक विक्रम त्यांच्या नावावर नोंदला जाणार आहे तो म्हणजे त्यांच्या तीन थरारपटांच्या पटकथा कादंबरीत रूपांतरित के ल्या जात आहेत.
रहस्यमय कथा-कोदंबऱ्यांवर चित्रपट काढणे ही बॉलीवूडची खासियत आहे. मात्र गेल्या काही वर्र्षांमध्ये आपली स्वत:ची अशी एक वेगळी शैली निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांनी इतके चांगले चित्रपट दिले की आपोआपच त्यांच्या पटकथा पुस्तकरूपात येऊ लागल्या. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट जरी चेतन भगत यांच्या ‘फाइव्ह पॉइंट समवन’ या पुस्तकावर आधारित असला तरी चित्रपट हिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या पटकथेचे खास पुस्तक प्रकाशित केले गेले. ‘क्रिश’सारख्या सुपरहिरो पटांनीही कॉमिक ची वाट चोखाळली आहे. मात्र थरारपटांच्या कथा पुस्तकरूपात येण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. विक्रम भट्ट यांचा ‘१९२०’ हा थरारपट, त्यानंतर याच चित्रपटाचा सिक्वल असलेला ‘१९२० एव्हिल रिटर्नस्’ आणि अजून प्रदर्शित न झालेला ‘खामोशियाँ’ अशा तीन चित्रपटांच्या कथा कादंबरीरूपात प्रकाशित होणार आहेत.
या कादंबरीतून आधी कधीही प्रकाशित न झालेली चित्रपटातील छायाचित्रे आणि कथा-चित्रपट बांधणीदरम्यान घडलेल्या अनेक गोष्टीही वाचकांसमोर येणार आहेत. ‘माझ्या चित्रपटांच्या कथांवर कादंबरी प्रकाशित होते आहे याचा मला खास आनंद होतो आहे.
थरारपटांना बऱ्याचदा ‘प्रौढ’ प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे माझ्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग हा मर्यादित होता. कादंबरी घरातल्या लहानमोठय़ा प्रत्येक सदस्यांकडून वाचली जाते. कादंबरीमुळे माझ्या कथा आता कुमारवयीन आणि तरुण वाचकांपर्यंतही पोहोचतील’, असे विक्रम भट्ट यांनी सांगितले.
‘खामोशियाँ’ हा चित्रपट अजून प्रदर्शितही झालेला नाही. वेगळी कथा आणि मांडणी असलेला हा चित्रपट ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याच वेळी कादंबऱ्याही वाचकांच्या हातात असतील, अशी माहिती भट्ट यांनी दिली.
‘खामोशियाँ’ची कथा खरे तर त्यांनी ‘हाँटेड’ या आपल्या थ्रीडी सिक्वलपटासाठी लिहिली होती. मात्र नवोदित दिग्दर्शक करण दारा यांना ही कथा आवडली आणि त्यांनी ‘खामोशियाँ’ हा आपला पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटासाठी या कथेची निवड केल्याचे भट्ट यांनी सांगितले.