रहस्य, रोमान्स कथांमध्ये हातखंडा असलेले लेखक-दिग्दर्शक-निर्माता विक्रम भट आता ‘स्पॉटलाइट’ ही वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. नव्या माध्यमातली भट स्टाइलची ही सीरिज दखल घेण्यासारखी आहे.

बॉलीवूडमध्ये ठरावीक विषय ठरावीक लोकांनीच हाताळावे असं आता जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. प्रेमकथा यशराज फिल्म्सने आणाव्यात. कौटुंबिक, नातेसंबंधांवरील चित्रपट करण जोहरने काढावेत. भव्यदिव्य दिसणारे सिनेमे सुरज भडजात्यांच्या कंपूतून यावेत. ऑफबीट सिनेमे विशाल भारद्वाज यांनीच तयार करावेत; ही यादी मोठी आहे. यापैकी काहींनी वेगळी वाट धरण्याचा प्रयत्न केला होता. पण फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे बॅक टू पॅव्हेलिअन असं झालं त्यांचं. या दिग्दर्शक-निर्मात्यांमध्ये एकाचं नाव घेतलं नाही तर योग्य दिसणार नाही. ते म्हणजे विक्रम भट. या लेखक-दिग्दर्शकाने मानवी नात्यांची गुंतागुंत, त्यातलं रहस्य या विषयावर अनेक सिनेमे लिहिले, दिग्दर्शित केले. आता त्यांनी मोर्चा वळवलाय तो वेब सीरिजकडे. ‘स्पॉटलाइट’ ही वेब सीरिज एकदम विक्रम भट स्टाइलची आहे. रोमान्स, रहस्य, गुन्हेगारी, राजकारण असं सगळं यात आहे. म्हणूनच तिच्या प्रत्येक भागाबद्दल उत्सुकता असते.

वाचा : गेल्या १४ वर्षांपासून हा अभिनेता राहतोय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये

ही गोष्ट आहे सना सान्यालची. वेब सीरिज सुरू होते ती सनावर झालेल्या हल्ल्यापासून. सना अभिनेत्री आहे. कोर्टात एका प्रसंगाचं शूटिंग सुरू असताना तिथेच तिच्यावर तिचाच एक जुना मित्र आणि दिग्दर्शक गोळी झाडतो. ती कोमात जाते. तिच्या आणि अभिनेता रोमेश प्रेमसंबंधांवरून आधीच एक केस सुरू असते. ती कोमात गेल्यामुळे ते प्रकरण थांबतं. मधल्या काळात एका ज्येष्ठ पत्रकाराला सनाच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहायचं म्हणून सनाने तिच्या आयुष्यातली इत्थंभूत माहिती त्या पत्रकाराला सांगितलेली असते. पत्रकाराकडे ती माहिती रेकॉर्डिगच्या स्वरूपात असते. सना कोमात गेल्यानंतर रोमोशकडे विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ असतो. त्या पत्रकाराकडे असलेले रेकॉर्डिग तो मिळवतो आणि जमेल तसं ऐकतो. या रेकॉर्डिगमुळे रोमेशला सनाच्या आयुष्यातल्या कित्येक नव्या गोष्टी समजतात. तिच्या भूतकाळाबद्दल समजतं. त्याला तिचं कौतुक, आदर वाटतो. तिच्याबद्दल सहानुभूतीही वाटते. सना तिथे मृत्यूशी झुंज देत असते. ती कोमातून बाहेर आल्यानंतर नेमकं काय होतं, रोमेश त्याचं सनावर असलेल्या खऱ्या प्रेमाची कबुली देतो का, रोमेश-सनाच्या केसचं काय होतं, रोमेश त्याच्या बायकोला ठणकावून सांगतो का अशा साऱ्या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर ‘स्पॉटलाइट’ ही सीरिज बघायलाच हवी.

03-lp-web-series-01

त्रिधा चौधरीने सना सान्याल ही व्यक्तिरेखा उत्तम साकारली आहे. सुरुवातीच्या दोन-तीन भागांमध्ये तितका जम बसून आला नव्हता. नंतर मात्र तिने त्या व्यक्तिरेखेची बऱ्यापैकी पकड घेतली. रोमेश साकारणारा सिद मक्करने अनेकदा त्याच्या हावभावावरून त्याला काय म्हणायचंय ते दाखवून दिलंय. सनासोबत घडलेला गैरप्रकार, त्याला विरोध करणारी तिची वृत्ती, मनोरजंनविश्वातील राजकारणात नकळत झालेला प्रवेश या सगळ्याचा प्रत्यय येणाऱ्या प्रत्येक प्रसंगानंतर रोमेशने व्यक्त केलेला राग, आदर, कौतुक, सहानुभूती त्याने हावभावांवरून अगदी स्पष्ट दाखवलंय. सीरिजमध्ये असलेले इतर कलाकारांनीही उत्तम काम केलंय. सुहैल ततरी या दिग्दर्शकानेही यासाठी मेहनत घेतलेली दिसते. ‘अंकुर अरोरा मर्डर केस’ या सिनेमाचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. एखाद्या सिनेमाचं रहस्य टिकवून ठेवण्यासाठी त्या कथेची मांडणी, प्रवाह तशाच प्रकारे पुढे नेणं गरजेचं असतं. ‘अंकुर अरोरा..’मध्ये ही जबाबदारी सुहैलने उत्तमरीत्या पार पाडली होती. तो अनुभव गाठीशी घेऊन त्याने सीरिजही त्याच दिशेने पुढे नेली आहे. प्रत्येक प्रसंगामागचं कारण, परिणाम हे सगळं फक्त संवादांमधून सांगण्याची गरज नाही हेही त्याने या सीरिजच्या माध्यमातून दाखवून दिलं. अनेकदा काही व्यक्तिरेखांच्या तोंडी संवाद नसून त्यांच्या देहबोलीतून प्रेक्षकांना अनेक गोष्टी कळतात. हे असं घडवून आणण्यामागे दिग्दर्शकाचं कौशल्य आहे. याशिवाय आरीफ झकरिया, राजेश खेरा, कृणाल पंडित या कलाकारांनीही त्यांना दिलेलं काम चोख केलं आहे.

ही सीरिज उत्तम होण्याचं श्रेय संकलनातसुद्धा आहे. सिनेमाच्या संकलनात त्याचं यश दडलेलं असतं. निर्माता विक्रम भट यांचा बॉलीवूडमधला दांडगा अनुभव इथे उपयोगी पडतो. त्यांनी सीरिजमध्येही संकलनाला तितकंच महत्त्व दिलं आहे. या सीरिजमध्ये सध्याचा काळ, त्यात रोमेश सनाचं रेकॉर्डिग ऐकतो तो फ्लॅशबॅक आणि ती त्या रेकॉर्डिगमध्ये तिचा भूतकाळ सांगते तो फ्लॅशबॅक असे दोन फ्लॅशबॅक आहेत. म्हणजे गोष्टीत गोष्ट आहे. पण याचा कुठेही गुंता होत नाही. अतिशय सुटसुटीत, समजेल अशी या सगळ्याची मांडणी केली आहे.

खरंतर सीरिजचा विषय नवीन नाही. मनोरंजनविश्व यापूर्वी अनेक सिनेमांमधून उलगडलं गेलंय. त्यातलं राजकारण, स्पर्धा, पुढे जाण्याची चढाओढ, नातेसंबंध असे अनेक धागेदोरे यात आहेत. एकाचा नाद सोडला की दुसरं समोर येतं. आणि दुसऱ्याचा सोडला की तिसरं समोर येतं. हे चक्र आहे. ते अखंड सुरूच राहतं. या विश्वात शिरणं एक वेळ सोपं आहे. पण त्यात टिकून राहणं तितकंच अवघड. हेच या सीरिजमधून सनाच्या प्रातिनिधिक रूपातून दिसतं. मनोरंजन विश्व आणि मीडिया यांचा संबंधही या सीरिजमध्ये ठळकपणे दिसून येतो. विक्रम भट यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. दस्तक, ऐतबार, हेट स्टोरी, अनकही, अंकुर अरोरा मर्डर केस असे अनेक सिनेमे त्यांनी लिहिले तर गुलाम, कसूर, मधोश, राज, हाँटेड अशा अनेक सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. त्यांनी वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचंही दिग्दर्शन केलं आहे. पण रहस्यमय सिनेमांची संख्या त्यात जास्त आहे. या सीरिजमध्ये विक्रम भट यांची छाप अगदीच दिसते.
एखादा सिनेमा मनोरंजक करायचा असेल तर त्यात गाणी, रोमान्स, कुरघोडी, मारामारी, भांडणं, नाटय़मयता असं सगळंच हवं. मसालेदार सिनेमा करायचा असेल तर खरंच या सगळ्या गोष्टींची गरज असते. याची विक्रम भट यांना चांगलीच जाण आहे. म्हणूनच त्यांनी या सीरिजमध्येही हे सगळं असेल याची काळजी घेतली आहे. वेब सीरिज हे माध्यम लोकप्रिय होत असलं तरी त्यापुढील आव्हान मोठी आहेत. कमी कालावधीचा आकर्षक, मनोरंजक भाग बनवणं हे महत्त्वाचं आव्हान आणि गोष्ट जुनीच असली तरीही ती रोमांचक पद्धतीने प्रेक्षकांसमोर कशी आणायची, त्यांना त्यात कसं गुंतवायचं हे दुसरं आव्हान. पण ही दोन्ही आव्हानं ‘स्पॉटलाइट’ने पेलली आहेत. सर्वोत्तम वर्गात बसणारी नसली तरी ही सीरिज प्रेक्षकांना गुंतवून मात्र नक्की ठेवते.

एक खटकणारी गोष्ट अशी की, विक्रम भटच्या काही सीरिजमध्ये एक समान धागा दिसून येतो; तो म्हणजे विवाहबाह्य संबंध. या नातेसंबंधातून निर्माण झालेला ताणतणाव, घडामोडी सीरिजमध्ये आहे. ‘स्पॉटलाइट’, ‘ट्विस्टेड’ आणि ‘माया’ या सीरिजमध्ये हा एक समान धागा हमखास दिसून येतो. त्यामुळे त्यात तोचतोचपणा वाटतो. तिन्ही सीरिजचे विषय वेगवेगळे असले तरी हा साचा मात्र तिन्हीत दिसतो. सीरिजने थोडा वेग घ्यायला हवा असेही वाटते. मधल्या काही भागांमध्ये ती थोडी रेंगाळली. कदाचित ती कथेची गरज असू शकते पण सना आणि एक दिग्दर्शक यांच्यात घडलेल्या गोष्टी पुन्हा सना आणि दुसरा दिग्दर्शक यांच्यात घडलेल्या दाखवलेल्या आहेत. त्यात बराच वेळ गेला. ते टाळलं असतं किंवा कमी कालावधीचं दाखवलं असतं तर सीरिज थोडी वेगाने पुढे सरकली असती.
एकुणात, वेब सीरिजचं जाळं पसरत चाललं आहे. बॉलीवूडची प्रस्थापित मंडळीही इथे वळली आहेत. त्यात महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये विक्रम भट यांचंही नाव घेता येईल. हिंदी सिनेमांतला त्यांचा हातखंडा त्यांनी वेबमध्ये आजमवला आहे. त्याला उत्तम प्रतिसादही मिळतोय. ‘स्पॉटलाइट’च्या निमित्ताने मनोरंजन विश्व आणि त्यातलं राजकारण, स्पर्धा, चढाओढ हे सगळं पुन्हा एकदा अनुभवायला मिळतंय; पण नव्या मांडणीतून!

चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा