उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण पाहता सध्या सर्वच क्षेत्रांतील दिग्गज याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात दहशतवादी तळ नष्ट केले होते. या घटनेनंतर राजकारण आणि कलाक्षेत्रामध्ये बऱ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या. आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही आपले मत मांडले आहे. त्यांनी फेसबूकच्या माध्यमातून आपले हे मत मांडले आहे. ‘उरीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपला देश पाकिस्तानी दहशतवाद्यांना युद्ध पातळीवर लढा देत आहे. सध्याच्या परिस्थितीत मी पाकिस्तान आणि कुठल्याही पाकिस्तानी व्यक्तीचा विरोधच करणार. पाकिस्तानी चाहत्यांना माझ्या या विचारांमुळे माझ्याबद्दल राग येत असेल तर गेले उडत. पाकिस्तान किंवा पाकिस्तानी लोकांची बाजू घेणाऱ्या प्रत्येक भारतीय व्यक्तीचा मला तिटकारा वाटतो, भले तो एखादा नेता, कलाकार असो किंवा कोणीही असो.’

‘माझ्या हातात असतं तर असल्या लोकांना मी चौकात उभं करून देशद्रोही वृत्तीसाठी सगळ्यात कडक शिक्षा दिली असती.
प्रत्येक भारतीय ज्याला देशाबद्दल प्रेम आहे तो माझा आहे. मग त्याचा धर्म, जातपात काहीही असो. तो भारतीय आहे आणि त्याला देशाबद्दल प्रेम आहे म्हणूनच तो माझा आहे.’

‘ज्या मूर्खांनी आपल्या देशाच्या विरोधात आणि पाकिस्तान किंवा पाकिस्तानी लोकांच्या बाजूने मीडियामध्ये बडबड केली आहे त्यांचा मला प्रचंड राग आहे. त्यातले काहीजण दुर्दैवाने माझे सहकारी पण आहेत. त्यांच्याबद्दलचे माझे विचार ऐकून ते यापुढे माझ्या बरोबर काम करणार नसतील तर ते ही गेले उडत. मला काहीही फरक पडत नाही. मीच असल्या लोकांबरोबर काम करणार नाही. मी प्रथम भारतीय आहे आणि भारतासाठी आहे.’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्याचा इशारा दिल्यानंतर ‘इम्पा’च्या ७७ व्या सर्वसाधारण बैठकीमध्ये पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सर्व प्रकरणाविषयी अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करत ‘ते कलाकार आहेत दहशतवादी नाहीत’ असे वक्तव्य केल्यामुळे अनेकांचा रोष ओढवून घेतला होता.