भारतीय दिग्दर्शक रीमा दास यांचा

ऑस्करसाठी भारताचे अधिकृत नामांकन असलेला ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ हा चित्रपट स्पर्धेतून बाद झाला असून, ९१व्या ऑस्कर पुरस्कारासाठी त्याचे नामांकन उत्कृष्ट परदेशी चित्रपट गटात झाले होते. आता हा चित्रपट बाद झाला असून ८७ पैकी केवळ नऊ चित्रपट पुढील फेरीत पोहोचले आहेत.

‘व्हिलेज रॉकस्टार्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा दास यांनी केले असून, तो आसामी चित्रपट आहे. खेडय़ातील मुलांच्या चमूला रॉकस्टार बनण्याचे स्वप्न असते असे त्याचे कथानक आहे. दास यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे, की ऑस्करचे स्वप्न भंगले असले तरी या अविश्वसनीय प्रवासासाठी मी सर्वाची ऋणी आहे. प्रत्येक पावलावर तुम्ही माझ्यासमवेत होतात. ऑस्करचे स्वप्न भंगले असले तरी स्वप्ने पाहण्यावरची आमची श्रद्धा कायम राहील. आतापर्यंत परदेशी चित्रपट गटात आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’ चित्रपट २००१ मध्ये अखेरच्या पाच चित्रपटांत होता. मदर इंडिया (१९५८), सलाम बॉम्बे (१९८९) हे दोन भारतीय चित्रपट पहिल्या पाचात होते.  ऑस्कर विजेते अल्फान्सो क्युरॉ यांचा ‘रोमा’ हा चित्रपट अखेरच्या आठात आहे. त्याला पावेल पावलिकोवस्की यांच्या ‘कोल्ड वॉर’ चित्रपटाचे कडवे आव्हान असणार आहे. त्यांना २०१३ मध्ये ‘इडा’ या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाले होते. जपानचा ‘शॉप लिफ्टर्स’ ही शर्यतीत आहे. बर्ड्स ऑफ पॅसेज (कोलंबिया), दी गिल्टी (डेन्मार्क), नेव्हर लुक अवे (जर्मनी), अयाका (कझाकिस्तान), बर्निग (दक्षिण कोरिया) हे चित्रपट स्पर्धेत आहेत. २४ फेब्रुवारीला ९१वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉसएंजल्स येथील डॉल्बी थिएटर्स येथे होणार आहे.