राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘विलेज रॉकस्टार्स’ या आसामी चित्रपटाची प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी भारताकडून निवड करण्यात आली आहे. ‘पद्मावत’, ‘राजी’, ‘पीहू’, ‘कडवी हवा’ आणि ‘न्यूड’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकत ‘विलेज रॉकस्टार्स’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. ‘ऑस्कर’ पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून या चित्रपटाची निवड झाल्याचं ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’कडून सांगण्यात आलं आहे.

रीमा दास दिग्दर्शित या चित्रपटाने यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. तर दमदार अभिनयकौशल्यामुळे भनिता दास हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट जवळपास ७०हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर चार राष्ट्रीय पुरस्कार आणि ४४ इतर पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावावर केले आहेत.

‘विलेज रॉकस्टार’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. २८ सप्टेंबर रोजी देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संगीत क्षेत्रात आपलं नाव कमावण्यासाठी धडपड करत असलेल्या एका १० वर्षीय मुलीची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

एकूण २९ चित्रपटांमधून ‘विलेज रॉकस्टार्स’ची निवड करण्यात आली आहे. राजी, पद्मावत, हिचकी, ऑक्टोबर, लव सोनिया, गुलाबजाम, महानटी, पिहू, कडवी हवा, बोगदा, रेवा, बायोस्कोपवाला, मंटो, १०२ नॉट आऊट, पॅडमॅन, भयानकम, आज्जी, न्यूड, गल्ली गुलैया या चित्रपटांना मागे टाकत ‘विलेज रॉकस्टार्स’ने बाजी मारली आहे.