05 July 2020

News Flash

नाटक-बिटक : समकालीन रंगभूमीची दृष्टी देणारा महोत्सव

एकूण भारतीय रंगभूमीसंदर्भात व्यापक दृष्टी देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव महोत्सव आहे.

विनोद दोशी नाटय़महोत्सवाने पुण्यातील रंगकर्मीना रंगदृष्टी देण्याचे काम केले आहे. या महोत्सवाला समकालीन रंगभूमीचा कॅलिडोस्कोप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोमवारपासून (२७ फेब्रुवारी) पाच दिवस (३ मार्चपर्यंत) यशवंतराव चव्हण नाटय़गृह येथे होत असलेल्या या नाटय़महोत्सवात बहुभाषिक नाटकांची मेजवानी मिळणार आहे.

केवळ प्रायोगिक नाटकांना व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू झालेल्या विनोद दोशी नाटय़महोत्सवाने आता स्वत:चे वेगळेपण निर्माण केले आहे. छोटय़ा पातळीवर सुरू झालेल्या या महोत्सवाने बहुभाषिक नाटकांचा महोत्सव होण्यापर्यंतचा प्रवास दिमाखात केला आहे. या महोत्सवाने पुण्यातील नाटय़चळवळीला रंगदृष्टी दिली आहे. एकूण भारतीय रंगभूमीसंदर्भात व्यापक दृष्टी देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव महोत्सव आहे.

प्रसिद्ध उद्योजक विनोद दोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रंगभूमीसाठी काहीतरी करायची विनोद दोशी फाउंडेशनची कल्पना होती. दोशी हे स्वत: नाटय़प्रेमी होते. त्यांच्या मुंबईतील घराच्या गच्चीत अनेक नाटकांच्या तालमी व्हायच्या. पं. सत्यदेव दुबे, गिरीश कर्नाड यांच्यासारख्या मान्यवर रंगकर्मीशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. त्यामुळे प्राधान्यानं समांतर रंगभूमीसाठी काहीतरी करायची विनोद दोशी फाउंडेशनची कल्पना होती. त्यातून नाटय़महोत्सव करावा असा विचार मांडण्यात आला. मुंबई आणि पुण्यातील मराठी-िहदी प्रायोगिक नाटकांना घेऊन हा महोत्सव करावा असे ठरले. सुरुवातीला दोन वष्रे मुंबई आणि पुण्यातली नाटकं घेऊन दोन्ही ठिकाणी हा महोत्सव झाला. प्रतिसादही चांगला मिळाला. मुंबईत पृथ्वी थिएटरसारख्या ठिकाणी सातत्याने नाटके, महोत्सव होत असतात. त्यामुळे मुंबईपेक्षा पुण्यातच नाटय़महोत्सव करण्याचे निश्चित झालं. जशी र्वष सरत गेली, तसा महोत्सवही बदलत राहिला, आशयदृष्टय़ा संपन्न होत राहिला.

‘महोत्सवात केवळ प्रायोगिक नाटकंच असतील, हा आमचा कटाक्ष होता. फक्त िहदी आणि मराठी नाटक करण्यापेक्षा इतर भाषांतील नाटकं करावीत या विचारातून तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा गुजराती नाटक केलं. पुण्यात त्या नाटकालाही उत्तम प्रतिसाद होता. त्यातून कळत गेलं, की प्रेक्षकांना चांगलं पाहण्याची भूक आहे,’ महोत्सवाचे आयोजक आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक कुलकर्णी यांनी सांगितलं. गुजराती नाटकाला मिळालेल्या प्रतिसादाने महोत्सवाचं स्वरूप बदलू लागलं. पुण्यात सहसा सादर होणार नाहीत अशी नाटकं भारतभरातून निवडली जाऊ लागली. एखाद्या नाटकाचे बाहेर कितीही प्रयोग झाले असले, तरी पुण्यातला पहिला प्रयोग या महोत्सवातून होईल, अशी नाटकं निवडली जाऊ लागली. तसेच मोहित टाकळकरच्या ‘गजब कहानी’सारख्या काही नव्या नाटकांचे प्रीमियर महोत्सवात झाले. आठ वर्षांत या महोत्सवाने पुणेकरांना उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी दिली. उदाहरणार्थ, सुनील शानबाग यांचे ‘मेरे पिया गये रंगून’, अभिषेक मुजुमदार दिग्दíशत ‘गाशा’, आदिशक्ती निर्मित ‘गणपती’, अतुल कुमार दिग्दíशत ‘पिया बहरुपिया’ अशा वैविध्यपूर्ण बहुभाषिक नाटकांची नावं घेता येतील. भारतीय प्रायोगिक रंगभूमीवरील वैविध्यपूर्ण नाटय़कृतींना या महोत्सवात सामावून घेतलं जातं. त्यामुळे समकालीन रंगभूमीचा कॅलिडोस्कोप नाटय़महोत्सवाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. गेल्या आठ वर्षांत पुण्यातील नव्या पिढीच्या रंगकर्मीना रंगदृष्टी देण्याचं काम या महोत्सवानं केलं आहे. इतर भाषांतील आणि अन्य प्रांतातील रंगभूमीवर होणारे प्रयोग पाहण्याची संधी प्रेक्षकांना दिली.

‘दरवर्षी महोत्सव आयोजित करणं हे खíचक काम आहे. आतापर्यंत झालेल्या महोत्सवाकडे ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून पाहिलं, तर अजून बरंच काही करणं शक्य आहे. अधिक वेगळे प्रयोग करता येऊ शकतील. मात्र, त्यासाठी आíथक पाठबळाची गरज आहे. कर्नाटकात सरकारने उभारलेल्या ‘रंगायन’च्या धर्तीवर महाराष्ट्रात हक्काचं नाटय़ केंद्र उभं राहायला हवं. या केंद्राला कर्नाटक सरकारकडून अनुदान देण्यात येतं. तसं महाराष्ट्रातही सरकारकडून मिळायला हवं. प्रायोगिक नाटकांनाही प्रेक्षकांचा पािठबा मिळण्याची गरज आहे. प्रायोगिक नाटकाच्या अर्थकारणाचा प्रश्न सुटला तर प्रायोगिक नाटय़चळवळ अधिक सकस आणि सुदृढ होईल’ असंही कुलकर्णी यांनी सांगितलं.

यंदाच्या महोत्सवाचा प्रारंभ सोमवारी (२७ फेब्रुवारी) ‘वुई डान्स अवरसेल्व्हज’ या रूपायतन संस्थेच्या मूकनृत्यनाटय़ सादरीकरणानं होणार आहे. त्यानंतर अभिषेक मजुमदार दिग्दíशत ‘मुक्तिधाम’ या नाटकाचं सादरीकरण होईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (२८ फेब्रुवारी) र. धों. कर्वे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या अतुल पेठे दिग्दíशत ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. अजित दळवी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. त्यात अभिनेता गिरीश कुलकर्णी र. धों. कर्वे यांच्या, तर राजश्री सावंत मालतीबाई कर्वे यांच्या भूमिकेत आहेत. दिल्ली येथील द टॅडपॉल रे पर्टरी संस्थेचा ‘स्टिल अँड स्टिल मुिव्हग’ हे िहदी आणि इंग्रजी भाषांतील नाटक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचं (१ मार्च) आकर्षण असणार आहे. इम्फाळ येथील सूरजित नॉन्गमेईकपम या तरुणाच्या अनोख्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या समकालीन नृत्यावर आधारित ‘नव्‍‌र्हज’ हा अभिनव प्रयोग महोत्सवाच्या चौथ्या दिवशी (२ फेब्रुवारी) होणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथील ‘ड्रामानॉन’ नाटय़संस्थेची निर्मिती असलेल्या ‘अक्षयांबरा’ या कानडी भाषेतील नाटकाच्या सादरीकरणाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.

chinmay.reporter@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2017 2:19 am

Web Title: vinod doshi memorial theatre festival 2017
Next Stories
1 …म्हणून पद्मिनीने ऋषी कपूरच्या कानशिलात लगावली
2 फॅन्सची न्यारी दुनिया
3 Rangoon: मी आजवर जे जे केलं ते उत्तमच.. – कंगना राणावत
Just Now!
X