|| विनोद सातव

चित्रपट आणि पाऊ स यांच्यात एक अतूट नाते आहे. राज कपूर – नर्गीस यांच्या ‘श्री ४२०’मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’पासून अगदी अलीकडे टायगर श्रॉफ – श्रद्धा कपूरच्या ‘बागी’मधील ‘छम छम छम’पर्यंत अनेक हिंदी, मराठी चित्रपटातील असंख्य गाण्यात नायक – नायिकेचा रोमँटिक अंदाज पावसामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. ‘मोहरा’ चित्रपटाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अक्षयकुमार – रवीना टंडन यांच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या ऑल टाइम हिट गाण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली होती. मोठय़ा पडद्यावर रोमांचित करणारा हा पाऊ स प्रत्यक्षात मात्र चित्रपटाच्या शूटिंगपासून ते अगदी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरसुद्धा व्यवसायावर नकारात्मक परिणाम करतो आणि त्याचा फटका कधी कधी संपूर्ण चित्रपट उद्योगाला बसतो हे निश्चित..

चित्रपट, मालिकोंचे चित्रीकरण म्हटलं की सर्वसामान्य प्रेक्षकाला फक्त ‘लाइट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शन’ एवढेच नजरेसमोर येते, मात्र हे तीन शब्द उच्चारण्यापूर्वी चित्रपटाच्या टीमला अनेक गोष्टींची पूर्वतयारी करावी लागते, याच पूर्वतयारीवर पावसाचे पाणी फिरले की संपूर्ण टीमची मेहनत पाण्यासारखी वाहून जाते, यामुळे पडद्यावर प्रेक्षकांना रोमांचित करणारा पाऊ स हा अनेकदा कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, वितरक यांच्या अंगावर शहारे निर्माण करतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण चित्रीकरण पुढे ढकलले गेले तर कलाकार, तंत्रज्ञ यांच्या तारखांचा घोळ निर्माण होतो, ऐनवेळी चित्रीकरण रद्द करावे लागले की निर्मात्याला आर्थिक भरुदड सहन करावा लागतो. पावसामुळे आउटडोअर चित्रीकरण करता येत नाही, कलाकारांना सेटवर वेळेत पोहचता येत नाही, प्रेक्षक चित्रपट किंवा नाटय़गृहात पोहोचू शकत नाहीत, असे अनेक परिणाम पडद्यावर सुखद वाटणाऱ्या पावसामुळे पडद्यामागे होत असतात.

मागील आठवडय़ापासून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि कोकणात धो-धो बरसणारा पाऊ स सामान्य नागरिकांचे हाल करतो आहे. रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीसह इतर अनेक घटकांवर परिणाम करणाऱ्या अतिवृष्टीच्या तडाख्यातून चित्रपटसृष्टीही सुटलेली नाही. सध्या राज्यात ज्या भागात पावसाचा जोर आहे, त्याच भागात मराठी चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. त्याच पुणे, मुंबई, कोल्हापूर भागातून मराठी चित्रपटाला चांगला व्यवसाय मिळतो. मात्र सामान्यांचे जगणे बेहाल झालेले असताना चित्रपटगृहात जाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक नसतात. याचा परिणाम मराठी चित्रपटांच्या तिकीटबारीवर झाल्याचे दिसून येते. पावसामुळे ‘गर्लफ्रेंड’, ‘बाबा’, ‘वन्स मोअर’ या चित्रपटांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे.

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या अनेक मालिकांनाही या पावसाचा फटका बसला असून अनेक मालिकांचे चित्रीकरण रखडल्याचे बघायला मिळाले. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकांचे चित्रीकरण सध्या ठाण्यात घोडबंदर येथे सुरू आहे. मागील आठवडय़ात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक कलाकार सेटवर पोहोचू शकले नाहीत. तर ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकांचे चित्रीकरण अनुक्रमे कोल्हापूर आणि सावंतवाडी येथे सुरू आहे. कोल्हापुरातील पावसामुळे ‘तुझ्यात जीव रंगला’चे चित्रीकरणही बंद झाले. आणि कलाकार जिथे राहतात तिथेही पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे हार्दिक जोशी, अक्षया देवधर, धनश्री काडगावकर यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत दुसरीकडे मुक्काम करावा लागला आहे. तर ‘रात्रीस खेळ चाले’चे सावंतवाडीत सध्या फक्त इनडोअर चित्रीकरण करण्यात येत आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे चित्रीकरण इनडोअर सुरू असल्याने त्यांचे काम सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

मालिका, चित्रपटाबरोबरच नाटय़क्षेत्रालाही पावसाचा तडाखा बसला आहे. ‘व्हॅक्युम क्लीनर’ नाटकाचा बोरिवली येथे नुकताच शंभरावा प्रयोग पार पडला. नाटकाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग चांगले होते, मात्र ऐन प्रयोगाच्या दिवशी जोरदार पाऊ स पडल्याने करंट बुकिंगवर २० ते ३० टक्के परिणाम झाल्याचे या नाटकाचे सहनिर्माता ‘जिगीषा’चे श्रीपाद पद्माकर यांनी सांगितले. तर ‘हॅम्लेट’ या नाटकाचे प्रयोग पावसाळ्यात सध्या थांबवण्यात आलेले आहेत, कारण या नाटकाचे नेपथ्य मोठे असल्याने पावसात त्याची वाहतूक करणे सोपे नाही. संततधार पाऊ स आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये हाहाकार उडाला आहे. या दोन्ही शहरांतून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नागरिक संकटात असताना नाटकाचा प्रयोग करणं योग्य वाटत नाही, असं सांगत अभिनेता सुबोध भावेने त्याच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कराड येथील नियोजित प्रयोग रद्द केले आहेत. दरम्यान, ‘अलबत्या गलबत्या’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘यदा कदाचित’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘सुखन’, ‘इडियट’, ‘देवबाभळी’, ‘गुमनाम है कोई’, ‘अ परफेक्ट मर्डर’ अशा अनेक नाटकांचे प्रयोग सुरळीत पार पडले आहेत.

नैसर्गिक आपत्तीसह इतर अचानक आलेल्या संकटाचा, उद्भवलेल्या परिस्थितीचासुद्धा चित्रपटांना मोठा फटका बसतो, हे याआधीही दिसून आलेले आहे. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीचा मालिका आणि चित्रपट क्षेत्राला मोठा फटका बसला होता. २००८ साली मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला याचाही परिणाम अनेक घटकांवर झाला त्यात चित्रपटांचाही समावेश होता, २६/११ च्या दोन दिवस आधी संजय नार्वेकरचा ‘धुडगूस’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, सुरुवात चांगली झाली मात्र या घटनेचा परिणाम तिकीटबारीवर झाला. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर झाली याचा परिणाम ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या प्रियांका चोप्रा निर्मित, राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’वर झाला, या चित्रपटाची सुरुवात उत्तम झाली होती. ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित सई ताम्हणकर – प्रिया बापट यांच्या ‘वजनदार’ आणि १८ नोव्हेंबर रोजीच्या ‘कौल’ या चित्रपटालाही त्याचा फटका बसला. नोटाबंदीच्या काळात नाटकांचेही अनेक प्रयोग रद्द करावे लागले होते. ऑगस्ट २००९ मध्ये प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री यांच्या ‘हाय काय, नाय काय’ या चित्रपटाला त्यावेळी आलेल्या ‘स्वाइन फ्लू’च्या साथीमुळे फटका बसला होता.

प्रसिद्ध हिंदी-मराठी चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्या मते जून, जुलै आणि ऑगस्ट हे महिने चित्रपट व्यवसायासाठी महत्त्वाचे असतात, कारण या काळात अनेक सण, उत्सव येतात. पावसाच्या परिणामांचा विचार केला तर असे दिसते की ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘हम आपके है कौन’ असे चित्रपट वर्षांनुवर्षे चित्रपटगृहात होते, पावसाळ्यात अगदीच संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले तरच चित्रपटांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होतो, मात्र तो फार काळ टिकणारा नसतो असे अनेकदा दिसले आहे. एकदा चित्रपट प्रेक्षकांनी स्वीकारला तर सामान्य प्रेक्षक उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याचा विचार न करता चित्रपटगृहात पोहचतातच. ‘झी स्टुडिओ’चे वितरक सादिक चितळीकर यांनी मात्र कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा फटका चित्रपट व्यवसायाला बसतोच असा अनुभव असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या ज्या भागात पावसाने हाहाकार माजवलेला आहे त्या भागातील चित्रपटगृहात प्रेक्षक येणार नाहीत हे निश्चित. त्यामुळे आता जे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, त्यांचा या भागात व्यवसाय होणार नाही. ग्रामीण आणि निमशहरी भागात याचा सर्वाधिक फटका बसतो. मोठय़ा शहरात परिस्थिती जरा बरी असते, कारण लोक घरात बसून राहण्यापेक्षा घराबाहेर पडणे पसंत करतात. येत्या १५ ऑगस्ट रोजी ‘बाटला हाऊ स’ आणि ‘मिशन मंगल’ हे दोन मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत तोपर्यंत ही परिस्थिती निवळलेली असेल अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

पुण्यातही पावसामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. ‘सिटी प्राइड’, कोथरूडचे व्यवस्थापक सुगत थोरात यांनीही मागील काही दिवसांपासून सलग सुरू असलेल्या पावसाचा परिणाम चित्रपटांच्या व्यवसायावर झाला असल्याचे सांगितले. गेल्या आठवडय़ातील शनिवार – रविवारी याचा फारसा परिणाम जाणवला नाही, मात्र छोटय़ा सेंटरमधून चित्रपटांचा व्यवसाय झालेला नसल्याने तिथे चित्रपटगृहांना सर्वाधिक फटका बसला असल्याची माहिती त्यांनी दिली.  औरंगाबाद येथील चित्रपट प्रदर्शक शौकत पठाण यांनीही पावसाचा चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होतोच असे सांगितले, मात्र यंदा महाराष्ट्रात सर्वदूर पाऊ स कोसळत असला तरी मराठवाडा मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने तेथील चित्रपटगृहात सर्व शो सुरळीत सुरू असल्याची माहिती दिली. या भागात सध्या हिंदीत ‘कबीर सिंग’ तर मराठीत ‘टकाटक’ या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असे सांगितले. या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘ये रे ये रे पैसा – २’ या मराठी चित्रपटालाही चांगले शो मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.  नाशिक शहर आणि परिसरात झालेल्या पावसामुळे तिथेही चित्रपटांना फटका बसला आहे. नाशिक शहरात चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक संख्या तरुण वर्गाची असते, मात्र नेमका शनिवार – रविवार जोरदार पाऊ स झाल्याने या वर्गाने चित्रपटाऐवजी पावसाळी पर्यटनाला प्राधान्य दिल्याचे दिसते. नाशिक शहर व परिसरात अनेक ठिकाणे ही नैसर्गिक सौंदर्याने बहरलेली आहेत, या ठिकाणी पावसाळ्यात तरुणाईची मोठी गर्दी होते. त्यामुळेही चित्रपट व्यवसाय मंदावतो, असे ‘पीव्हीआर’ नाशिकच्या व्यवस्थापकांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती किंवा समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचे पडसाद विविध घटकांमध्ये जसे उमटतात, तसेच ते कलाविश्वावरही परिणाम करत असतात. विशेषत: नाटक, चित्रपट यांच्या तिकीटबारीवर समाजातील तात्कालिक घटनांबरोबरच नैसर्गिक आपत्तीचाही काहीसा परिणाम होत असतो. या आठवडय़ात हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा २’ हा मराठी मल्टीस्टार आणि सिद्धार्थ मल्होत्रा, परिणीती चोप्राचा ‘जबरीया जोडी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, विविध नाटकांचेही प्रयोग लागलेले आहेत, तसेच १५ ऑगस्ट आणि इतर सुट्टय़ांमुळे येणाऱ्या आठवडय़ातही ‘मिशन मंगल’, ‘बाटला हाऊस’सारखे मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे चित्रपट उद्योगासाठी हा आठवडा व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. निदान आता महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर पुणे-मुंबई शहरी भागात, तसेच नागपूर – औरंगाबाद – नाशिक येथील चित्रपटगृहांना चांगला व्यवसाय करता येईल, असे चित्र दिसते आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विशेषत: सांगली -सातारा, कोल्हापूर येथील जनजीवन पूर्वपदावर येण्यास लागणारा वेळ लक्षात घेता या भागातील चित्रपटगृहांचा व्यवसाय मंदावणार आहे. यात पुन्हा पावसाचा जोर वाढून पुन्हा व्यवसायावर पाणी फिरू नये.. हीच या व्यवसायातील मंडळींची प्रार्थना आहे.

(लेखक मराठी चित्रपटांसाठी माध्यम सल्लागार म्हणून काम पाहतात.)