बॉलीवुड अभिनेता आणि लोकप्रिय स्टॅण्डअप कॉमेडियन असणाऱ्या वीर दासची एक पोस्ट सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये वीर दासने सध्याच्या परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. कोणावरही थेट टीका न करता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण आजच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर मला होते असं म्हणत वीर दासने मनमोहन सिंग यांचं एका वाक्य ट्विट केलं आहे.

“आठवतंय जेव्हा मनमोहन सिंग यांनी, “History will remember me kindly” असं म्हटलं होतं. त्यावेळी मला ते फारसं अर्थपूर्ण वाटलं नव्हतं. आणि आज २०२१ मध्ये मला नक्कीच असं म्हणावंसं वाटतंय की ते बरोबर बोलले होते,” असं ट्विट वीर दासने केलं आहे. इतिहासात माझ्या कार्यकाळाची आणि नेतृत्वाची दखळ दयाळूपणे घेतली जाईल असं मनमोहन सिंग यांनी एका भाषणात म्हटलं होतं. त्याचाचसंदर्भत वीर दासने आपल्या ट्विटमधून दिलाय. विशेष म्हणजे एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाटत असतानाच दुसरीकडे बंगाल निवडणूकांमधील प्रचारसभांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत असतानाच वीर दासने हे ट्विट केल्याने अप्रत्यक्षपणे त्याने पंतप्रधानांवर निशाणा साधल्याचीही चर्चा इंटरनेटवर आहे.

याच संदर्भात पुढे स्पष्टीकरण देताना, “मी फारसं म्हत्वाचं नाही म्हटलं ते इतिहासाच्या दृष्टीने म्हटलं. मला नाही वाटतं आपण इतिहासातल्या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवतं. त्याचप्रमाणे ही गोष्ट (मनमोहन सिंग यांचं वक्तव्यही) आपण विसरलो असतो असं मला म्हणायचं आहे. मात्र आता वाटतंय त्याप्रमाणे आपल्याला रोज त्यांची अधिक प्राकर्षपणे आठवण येतेय,” असंही वीर दास म्हणालाय.

मागील काही दिवसांपासून करोना परिस्थिती आणि देशात त्यावरुन सुरु असणाऱ्या राजकारणासंदर्भात अनेक सेलिब्रिटीमुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त होताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री तेजस्वी पंडितनेही इन्स्टाग्राम स्टेटसमधून राजकारणाच्या किडीपासून सावध राहण्याची सर्वांना गरज असल्याचा टोला नुकताच लगावला होता.