प्रसिद्ध गायीका रानू मंडल यांचे नाव सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अलिकडेच त्यांचा मेकअप केलेला एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट संध्या यांनी त्यांचा मेकअप केला होता. परंतु रानू यांचा हा नवा अवतार प्रेक्षकांना खास पसंत पडला नाही. त्यांनी सोशल मीडियाव्दारे या मेकओव्हरची यथेच्च खिल्ली उडवली होती. आता या संपूर्ण प्रकरणावर संध्या यांनी स्पष्टीकरण दिले आहे. रानू मंडल यांचा व्हायरल होणारा फोटो खोटा होता, असे त्यांनी म्हटले आहे.

संध्या यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका बाजूला संध्या यांनी स्वत: मेकअप केलेला फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला एडिट केलेला खोटा फोटो आहे. “रानू मंडल यांची खिल्ली उडवण्यासाठी कोणीतरी हा फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केला होता.” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

रानू यांना त्यांच्या मेकओव्हर फोटोमुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्याचबरोबर रानू यांच्या मेकअप आर्टिस्टची देखील नेटकऱ्यांनी फिरकी घेलती होती. एका नेटकऱ्याने तर रानू यांचा मेकअप करणाऱ्या आर्टिस्टला २०२० मध्ये ऑस्कर देण्यात यावा अशी विनंती देखील केली होती. तर काही नेटकऱ्यांनी रानू मंडल यांचा फोटो फोटोशॉप केला असल्याचे म्हणत पाठिंबा दिला होता.