भीषण पूर स्थितीचा सामना करणाऱ्या केरळमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालं आहे. त्यामुळे केरळची ही विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यासाठी सर्व स्तरांमधून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे येत आहे. अनेकांनी येथील नागरिकांसाठी आर्थिक मदत पोहोचवली आहे. मात्र विराट आणि अनुष्का या जोडीने केरळच्या पुरामध्ये अडकलेल्या प्राण्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

आतापर्यंत केरळला अनेक सेलिब्रेटी, कलाकार तसंच काही राज्यांनी आर्थिक मदत केली आहे. येथील नागरिकांना खाद्यपदार्थ, दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू आणि आर्थिक मदत पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचं जीवन स्थिर होण्यासाठी काही अंशी मदत होणार आहे. मात्र या पुरामध्ये आतापर्यंत अनेक मुक्या जीवांनाही त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. तर काही जनावरे अत्यावस्थेत आहेत. त्यामुळे विरुष्काने अत्यावस्थेत असलेल्या प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, विरुष्काने एका एनजीओच्या माध्यमातून केरळमधील जनावरांसाठी एक ट्रक भरुन खाद्यपदार्थ आणि औषधे पाठविण्याची व्यवस्था केली आहे. या एनजीओच्या ८ कर्मचाऱ्यांची तुकडी यासाठी कार्यरत झाली असून लवकरच येथे अडकलेल्या जनावरांपर्यंत ही मदत पोहोचणार आहे.

दरम्यान, नॉटींगहॅमच्या मैदानात इंग्लंडबरोबरचा सामना संपल्यानंतर भारतीय संघाने, आपला विजय हा केरळच्या पूरात प्राण गमावणाऱ्या लोकांना समर्पित केला आहे. याचसोबत सर्व खेळाडू एका सामन्याचं मानधन  मदतनिधी म्हणून देणार असल्याची घोषणाही विराट कोहलीने केली आहे.