सध्या बॉलिवूड आणि क्रिकेट वर्तुळामध्ये वारे वाहत आहेत ते म्हणजे क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किचच्या लग्नाचे. येत्या ३० तारखेला युवराज आणि हेजल शीख धर्माच्या रुढी-परंपरांनुसार विवाहबद्ध होणार आहेत. त्यांच्या या लग्नसोहळ्यामध्ये विविध कलाकार आणि क्रिकेटपटूही हजेरी लावणार आहेत. युवीच्या लग्नाला भारतीय क्रिकेट संघातील जवळपास सर्वच खेळाडू त्याला शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा युवराजच्या पाहुण्यांच्या यादीत आहे. विराट कोहली आणि युवराजची मैत्री तर सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे विराट युवीच्या लग्नाला जाणार यात शंकाच नाही. पण विराटसोबत अनुष्काही युवी-हेजलच्या लग्नाला हजेरी लावणार आहे अशी चर्चा आहे.

गेल्या काही काळापासून विराट आणि अनुष्का एकमेकांसोबत जास्तच वेळ व्यतीत करत आहेत. त्यामुळे युवराजच्या लग्नाच्या निमित्ताने विराट आणि अनुष्काही त्यांच्या नात्याचा सर्वांसमोर स्वीकार करतील आणि त्यांच्या नात्याबद्ल सर्वांसमोर काही खास घोषणा करतील असे सूत्रांनी सांगितले आहे. विराट आणि अनुष्काच्या नात्यात काही महिन्यांपूर्वी दुरावा आला होता. पण, नात्यात आलेल्या या संकटाच्या वादळावर मात करत या दोघांनीही पुन्हा एकत्र येत त्यांच्या नात्याला आणखी एक संधी दिली. तेव्हापासूनच विराटचा वाढदिवस असो किंवा मग क्रिकेटचा सामना. वेळात वेळ काढून शक्य असेल तेव्हा तेव्हा अनुष्का विराटला वेळ देते. बॉलिवूड आणि क्रिकेटमधील नाते आणि प्रेमसंबंधांचं हे रिंगण काही नवं नाही. याआधीही अनेक जोड्यांनी या दोन क्षेत्रांना जवळ आणलं आहे. तसं पाहिलं तर अनुष्का आणि विराटवर प्रसारमाध्यमं आणि छायाचित्रकारांची नेहमीच नजर असते. त्यामुळे युवराजच्या लग्नामध्ये विराट-अनुष्का नक्की काय घोषणा करणार याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा: युवराज सिंगच्या लग्नात वडील राहणार गैरहजर

विराट आणि अनुष्काच्या नात्याची सद्यस्थिती पाहता अशीच शक्याता वर्तविण्यात येत आहे की हे दोघंही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करुन लवकरच लग्न करण्याचाही निर्णय घेतील. त्यामुळे विराट-अनुष्काकडेच सध्या अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, युवराज सिंगच्या लग्नाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून पाहुण्यांची ये-जा सुरु झाली आहे. त्यामुळे लग्नसोहळ्याची एकंदर रंगत पाहता विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत युवी आणि हेजलचा हा लग्नसोहळा रंगणार आहे.