विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी ११ डिसेंबरला लग्न केले. त्यांच्या लग्नाची जेवढी चर्चा होतेय तेवढीच चर्चा आता त्यांच्या हनिमूनबद्दलही होत आहे. इटलीमध्ये शाही लग्न केल्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत. भारतीय संघ लवकरच आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यामुळेच नवीन वर्षाचा पहिला आठवडा अनुष्का विराटसोबत दक्षिण आफ्रिकेतच असणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर अनुष्का आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करेल. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

क्रिकेट दौऱ्याच्यानिमित्ताने विराट जवळपास दोन महिन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेत असणार आहे. या दौऱ्यात एकूण ३ कसोटी सामने, ६ एकदिवसीय सामने आणि ३ टी- २० सामन्यांचा समावेश आहे. ५ ते २८ जानेवारीपर्यंत कसोटी सामने खेळवले जातील. तर पहिला एकदिवसीय सामना १ फेब्रुवारीला खेळण्यात येणार आहे. तर टी- २० चे सामने १८, २१ आणि २४ फेब्रुवारीला खेळवले जातील.

https://www.instagram.com/p/BckiwtrnnZB/

विरुष्काच्या लग्नाचे समारंभ ९ डिसेंबरपासून सुरू झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे लग्न पंजाबी आणि उत्तर भारतीय पद्धतीने झाले. त्यानंतर २१ तारखेला दिल्लीत आणि मुंबईत २६ तारखेला लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. या रिसेप्शनला क्रिकेट जगतातील आणि बॉलिवूड जगतातील अनेक नामवंत चेहरे उपस्थित राहतील.

https://www.instagram.com/p/Bcl4RK8nfMX/