भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी परिसरात ३४ कोटींचे आलिशान घर विकत घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. विराट स्वतःच्या मनाप्रमाणs हे घर सजवतही होता. पण आता विराटने या घरासोबतचा करार रद्द केला आहे. इकोनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, विराटने २०१६ मध्ये ‘ओमकार रिलेटर्स अॅण्ड डेव्हलपर्स रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘ओमकार १९७३’ या टॉवरमध्ये ५ बीएचकेचे घर खरेदी केले होते.

३५ व्या मजल्यावर असणारे हे घर ७,१७१ चौरस फुटांचे आणि ‘सी फेसिंग व्ह्यू’ असणारे होते. पण विराटने २० मार्चला या घरासोबतचा करार मोडला आहे. तर सध्या तो पेन्टहाऊसच्या शोधात आहे. वांद्रे ते वर्सोवा परिसरात तो चांगल्या प्रॉपर्टीच्या शोधात आहे. सध्या तो वरळी परिसरातच एनीबेझंट रोड मार्गावरील रहेजा लिझंट एका इमारतीत ४० व्या मजल्यावर भाड्याने राहतो.

विराटने या घराचा २४ महिन्यांचा भाड्याचा करार केला असून या घरी तो २०१९ पर्यंत राहू शकतो. या घरासाठी विराटने १.५ कोटी रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिली आहे. २६७५ चौरस फुटांचे हे घर ४० व्या मजल्यावर आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माने डिसेंबरमध्ये इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. लग्नानंतर दोघंही वरळीमध्येच राहत आहेत. विराट मूळचा दिल्लीचा असून अनुष्कासाठी तो मुंबईत राहायला आला.

दरम्यान, कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी-२० अशा सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. विराटला बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सने १७ कोटींची किंमत मोजून आपल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.