Virat Kohli  :भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस. विराट हा मैदानावर आणि मैदानाबाहेर कायमच चर्चेत असतो. विराटबरोबरच त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही कायमच चर्चेत असते. त्यामुळेच हे दोघे जेव्हा जेव्हा सार्वजनिक जिवनामध्ये एकत्र दिसतात तो चर्चेचा विषय ठरतो. कधी अनुष्का विराटच्या सामन्याला हजेरी लावते, तर कधी विराट अनुष्काच्या चित्रपटांची तोंडभरून कौतुक करतो. त्यामुळे हे दोघेही आपल्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतात. त्यांची प्रेमकहाणीदेखील साऱ्यांच्या चर्चेचा विषय असतो. प्रत्येक प्रेमकहाणीची पहिली भेट खास असते. ती भेट आयुष्यभर प्रत्येकाला लक्षात राहते. विराट आणि अनुष्कादेखील पहिल्यांदा जेव्हा भेटले, तेव्हा त्यांच्यात नक्की काय संवाद घडला याबाबत विराटने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये उत्तर दिले. अमेरिकेतील एका टीव्ही शो मध्ये विराटने अनुष्काशी आपल्या पहिल्या भेटीबद्दलचं गुपित उघडं केलं.

२०१३ मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीसाठी हे दोघे पहिल्यांदा भेटले. त्या भेटीबाबत बोलताना विराट म्हणाला, “मी पहिल्या वेळी जेव्हा अनुष्काला भेटलो, तेव्हा मी तिच्याशी गमतीशीर पद्धतीने हलक्या फुलक्या शब्दामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी खरं तर थोडा नर्व्हस होतो, म्हणून मी एक जोक क्रॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नक्की काय बोलावे, काय करावे हे मला नक्की कळत नव्हते. मी शूटिंगच्या सेटवर होतो. मला तिच्यासोबत जाहिरातीचं शूटिंग करायचं होतं. त्यामुळे माझ्या मनात थोडी भीती नक्कीच होती.”

“अनुष्का जेव्हा शूटिंगसाठी आली, तेव्हा ती हिल्समुळे खूपच उंच दिसत होती. ती हिल्स घालून आल्यावर मी तिला म्हटलं की तू माझ्यापेक्षाही उंच दिसते आहेस. त्यावर तिने मला सांगितलं की मी काही ६ फूट वगैरे उंच नाही. मी हिल्समुळे इतकी उंच दिसते आहे. त्यावर तुला आणखी उंच हिल्सच्या चपला मिळाल्या नाहीत का? असं मी तिला गमतीत म्हटलं. मला वाटलं की ते फारच गमतीशीर आहे, पण खरं तर मी तसं बोलायला नको होतं. कारण त्यानंतर ती थोडी चिडल्यासारखी वाटली, पण मी गमतीत ती गोष्ट बोललो हे मी तिला लगेच सांगितलं. मी केलेला विनोदाचा प्रयत्न फसला हे बघितल्यानंतर मलाच फार अवघडल्यासारखं झालं. तिला शूटिंगची सवय होती, पण मला तसा काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे मी त्या वेळी थोडासा मूर्खच ठरलो”, असं विराटने कबून केलं.

तसेच लग्नाचं पूर्ण प्लॅनिंगदेखील अनुष्काने केलं होतं आणि तिने ते सगळं अत्यंत गोपनीय ठेवलं होतं, हेदेखील कोहलीने या मुलाखतीत नमूद करत अनुष्काला शब्बासकी दिली.