दिवाळी म्हटलं की दिवाळी पहाटचा कार्यक्रम हा आलाच. भल्या पहाटे उठून सुरांच्या मैफिलीने दिवसाची सुरुवात करण्याचा आनंद आणि उत्साह त्या काळात काही औरच असतो. सध्याच्या काळात अनेक ठिकाणी दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात येतं.मात्र, यावेळी करोनाचं संकट लक्षात घेता यंदा व्हायरस मराठीवर ऑनलाइन दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या काळात दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कथा, कविता, चित्र, अभिवाचन अशा अनेक गोष्टींचं कलाकार सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाची सुरवात ‘तरतीतो’ पासून होणार असून १०, ते १२ नोव्हेंबरपर्यंत सलग तीन दिवस या मालिकेचा दिवाळी विशेष भाग पाहायला मिळणार आहे. त्यानंतर १३ नोव्हेंबरला ‘साहित्य चित्र मैफिल’चे आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेते-दिग्दर्शक समीर पाटील, लेखिका मनाली काळे, ‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अभिनेत्री शर्मिला शिंदे आणि कल्पना जगताप, दिग्दर्शक संतोष कोल्हे हे दिग्गज कथा, कविता, अभिवाचनाचे सादरीकरण करणार आहेत.

१४ नोव्हेंबरला अंकिता देसाई, रमेश चांदणे आणि सृजन देशपांडेची तर्मन मैफिल पाहायला मिळणार आहे. तर १५ आणि १६ नोव्हेंबरला चैतन्य सरदेशपांडे, अंकिता देसाई, सृजन देशपांडे, विनम्र भाबल आणि कुणाल बने यांची स्टँडअप कॉमेडी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
दरम्यान, दिवाळी पहाटचा हा कार्यक्रम व्हायरस मराठीच्या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळणार असून १० ते १६ नोव्हेंबरमध्ये रोज सकाळी ७ वाजता या कार्यक्रमाचे भाग प्रीमियर करण्यात येणार आहेत.