विराट, अनुष्काच्या लग्नसोहळ्यामध्ये कोणत्या पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे, इथपासून त्यांच्या या खास दिवसासाठी आणखी कोणती विशेष व्यवस्था करण्यात आली होती, याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकांनीच इंटरनेटची मदत घेतल्याचे पाहायला मिळते. विराट, अनुष्काच्या या स्वप्नवत लग्नसोहळ्याविषयी कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. पण, सरतेशेवटी त्यांच्या लग्नाविषयीची काही माहिती समोर येण्यास सुरुवात झाली.

इटलीतील टस्कनीमध्ये असणाऱ्या बोर्गो फिनोशिएतो Borgo Finocchieto या आलिशान रिसॉर्टमध्ये ‘विरुष्का’च्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची लग्नगाठ बांधली जाण्यापूर्वीच विवाहस्थळाचे काही फोटो सोशल मी़डियावर व्हायरल झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बरीच माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आलेल्या या लग्नाविषयी आता काही गोष्टी सर्वांसमोर येत आहे. ज्या ठिकाणी हे ‘स्टार कपल’ विवाहबंधनात अडकले तेथे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती.

लग्न म्हटले की त्यासाठी विविध कामांमध्ये झटणारे काही हात आले. ‘विरुष्का’च्या लग्नाच्या निमित्तानेही बऱ्याचजणांची मदत झाली. पण, त्याबद्दल कोणतीही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचली नाही. कारण, त्यात सहभागी झालेले छायाचित्रकार, शेफ आणि त्या रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून एका करारावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या होत्या. या ‘नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंट’ (एनडीए)वर स्वाक्षरी केल्यामुळेच विराट, अनुष्काच्या लग्नाविषयीची कोणतीही माहिती शेवटच्या क्षणापर्यंत उघड करण्यात आली नव्हती. पण, अखेर संपूर्ण विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर या नवविवाहीत जोडप्यानेच याविषयीची माहिती सर्वांना देत सोशल मीडियावरुन आपल्या नात्याची ग्वाही दिली.

इटलीतील विवाहसोहळ्यानंतर ते दोघंही मायदेशी परतणार असून, २१ डिसेंबरला दिल्लीत त्यांच्या लग्नानिमित्त एका स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर, मुंबईत २६ डिसेंबरला क्रीडा आणि कलाविश्वातील आपल्या मित्रमंडळींसाठीही ‘विरुष्का’ने जंगी पार्टीचे आयोजन केले आहे.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

या ‘स्टार वेडिंग’साठी किती खर्च झाला होता माहितीये?

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमस आणि नवीव वर्षाच्या काळात Borgo Finocchieto हे जगातील दुसरे महागडे रिसॉर्ट आहे. या काळात हे रिसॉर्ट दर आठवड्याला ९४,८३,२१० रुपये भाडे घेते. याचाच अर्थ दर दिवासामागे १३,५४,७४४ रुपये इतके भाडे मोजावे लागते. Borgo Finocchieto हे आठशे वर्षांपूर्वी वसलेले गाव आहे. काही वर्षांपूर्वी जॉन फिलिप्स याने या गावाचा कायापालट केला.