करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत गरजुंची मदत करण्यासाठी देशभरातील अनेक लोकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये पैसे दान केले होते. या पैशांचा हिशोब बॉलिवूड संगीतकार विशाल दादलानी याने केंद्र सरकारकडे मागितला आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा झालेल्या पैशांचं काय झालं? असा प्रश्न त्याने विचारला आहे.

अवश्य पाहा – आलिया भट्टच्या बहिणीला बलात्कार व जीवे मारण्याची धमकी; करणार कायदेशीर कारवाई

अवश्य वाचा – आणखी एका कलाकाराची आत्महत्या; २७ व्या वर्षी गोळी घालून संपवलं आयुष्य

“लोकांनी पंतप्रधान सहाय्यता निधीमधील पैशांबाबत विचारणं आता बंद केलं आहे. आपण प्रश्न विचारायला घाबरतो. प्रशासनाकडे आपण उत्तर मागत नाही. आपण सेवाशील आणि गुलाम आहोत. म्हणूनच भारत महाशक्ती झाला नाही. अशा आशयाचं ट्विट विशालने केलं आहे.” त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

देशात २४ तासांत २८ हजार रुग्ण

देशात गेल्या २४ तासांमध्ये २८ हजार ७०१ करोना रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ८ लाख ७८ हजार २५४ झाली. देशात आतापर्यंत ५.५ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत १८ हजार ८५० रुग्ण करोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे. १९ राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. करोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण राष्ट्रीय स्तरावर २.६४ टक्के आहे. गेल्या २४ तासांत ५०० रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या २३ हजार १७४ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६,४९७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ६० हजार झाली आहे. करोनाने आणखी १९३ जणांचा बळी घेतल्याने राज्यात मृतांची एकूण संख्या १०,४८२ वर पोहोचली आहे.