जुन्या गाण्यांचे रिमिक्स करण्यावरुन गेल्या एक-दोन वर्षांमध्ये प्रचंड वाद-प्रतिवाद निर्माण झाले आहेत. जुन्या गायक-संगीतकारांबरोबरच आजच्या पिढीतील काही संगीतकारांनीही याविषयी असंतोष व्यक्त केला आहे. मात्र तरीदेखील जुन्या गाण्यांचं रिमिक्स करणं काही केल्या थांबलेलं नाही. उलटपक्षी हे प्रमाण वाढलेलं आहे. अनेक गीतकार-संगीतकारांनी या रिमिक्स करण्याच्या पद्धतीविषयी नाराजी व्यक्त करुनही फारसा काही फरक पडलेला नाही. त्यातच आता संगीतकार विशाल दादलानीने नाराजी व्यक्त करत ‘जर माझ्या गाण्यांचं रिमेक केलं तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल’, अशी सक्त ताकीद दिली आहे.

विशालने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या गाण्याचं रिमिक्स केलं तर कायदेशीर कारवाई करेन असं सांगितलं आहे. “सूचना, आमची परवानगीशिवाय, गाण्याचं श्रेय न देता कोणीही विशाल आणि शेखर यांच्या गाण्याचं रिमिक्स करु नये. जर असं करताना कोणी आढळलं तर मी न्यायालयात धाव घेईन. ही प्रत्येकाची वयैक्तिक बाब आहे. त्यामुळे आमच्या गाण्याचं कोणी रिमिक्स करण्याचा प्रयत्न केला तर मग तो मित्र जरी असला तरी मी कायदेशीर कारवाई करणार. ‘साकी साकी’ गाण्याच्या रिमेकनंतर माझ्या ‘दस बहाने’, ‘दीदार दे’, ‘सजना जी वारी वारी’ आणि ‘देसी गर्ल’ या गाण्याचा रिमेक करण्याच्या विचारात आहेत. मात्र प्रत्येकाने स्वत:ची गाणी तयार करा”, असं विशालने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

 वाचा : Photo : ‘शोले’ मधील सुरमा भोपाली पाहा आता कसे दिसतात

दरम्यान, विशाल दादलानी हे प्रसिद्ध संगीतकार जोडी विशाल-शेखर मधील एक संगीतकार आहे. शेखर रावजीयानी आणि विशाल दादलानी यांची ही जोडी नेहमीच प्रेक्षकांवर त्यांच्या संगीताने आणि धम्माल गाण्यांनी भुरळ घालत असते. आजवर या संगीतकार जोडीने बऱ्याच चित्रपटांना संगीत दिले आहे. सध्या विशाल इंडियन आयडॉल ११ च्या परिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत.